चेन्नई, 09 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केला. प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी जंगल सफारी केली. रविवारी सकाळी ते बांदीपूर वाघ अभयारण्यात गेले. त्यानंतर मोदींनी थेप्पाकडूनतील हत्ती कॅम्पला भेट दिली. यावेळी आय़ोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशातील वाढलेल्या वाघांच्या संख्येवरून प्रोजेक्ट टायगरचं कौतुक केलं. मोदी म्हणाले की, आपल्यासाठी आणखी सुखावणारी गोष्ट म्हणजे आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करतोय. त्याचवेळी जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी ७५ टक्के वाघ भारतातच आहेत. आपण एका मोठ्या टप्प्याचे साक्षीदार आहोत. प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली. भारताने फक्त वाघांना वाचवलं नाही तर त्यांना आवश्यक अशी इको सिस्टिम दिलीय. काळी टोपी, प्रिंटेड टी शर्ट अन् जॅकेट; PM मोदींचा नवा लूक व्हायरल देशातील वाघांच्या गणनेचा अहवाल पंतप्रधान मोदींनी आज जाहीर केला. नव्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये देशात वाघांची संख्या ३१६७ होती. गेल्या ४ वर्षात वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली. याआधी २०१८ मध्ये वाघांची सख्या २९६७ इतकी होती. पंतप्रधान मोदींना कार्यक्रम स्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यानं त्यांनी सर्वांची माफीही मागितली. ते म्हणाले की, मी सकाळी सहा वाजता गेलो आणि वेळेत परत येईन असं वाटलं. पण मला एक तास उशीर झाला. तुम्हाला माझ्यामुळे वाट पाहावी लागली त्याबद्दल माफी मागतो. एलिफंट व्हिस्परर्स डॉक्युमेंट्रीमधील दाम्पत्याला पंतप्रधान मोदी भेटले. यावेळी मोदींनी डॉक्युमेंट्रीचं कौतुक केलं. ते म्हणाले की, नेचर आणि क्रिएचर यांच्यातील अद्भुत अशा संबंधांचा आपला वारसा ही डॉक्युमेंट्री दाखवते. परदेशातील लोकांना आग्रह आहे की तुम्ही आमच्या आदिवासींचे समाजजीवन आणि परंपरांमधून तुमच्या देशासाठी काही ना काही घेऊन जा.