केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव झाले भावूक
बालासोर,05 जून : ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर 51 तासांनी रेल्वेसेवा पुर्ववत झाली. रविवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी पहिली ट्रेन रुळावरून गेली. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेसुद्धा उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम इथून राउरकेलाच्या दिशेने गेली. मालगाडी रुळावरून गेल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हात जोडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर म्हटलं की, डाऊन लाइन पूर्णपणे दुरुस्त झाली आहे. यावरून पहिली ट्रेन रवाना झाली. त्यानंतर अप लाइनवरून वाहतूक सुरू झाली आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी 1 हजारहून अधिक कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केल्याने हे शक्य झाले. रविवारी सायंकाळपर्यंत अपघातग्रस्त रेल्वेचे डबे आणि इतरत्र विखुरलेले तुकडे बाजूला करण्यात आले. त्यानंतर ट्रॅक ट्रायल रनसाठी तयार झाला.
ओडिशा ट्रेन अपघातात बेपत्ता लोकांना त्यांचे कुटुंबीय लवकरात लवकर शोधू शकतील यासाठी प्रयत्न करण्याचा उद्देश आता आहे. अजूनही जबाबदारी संपलेली नाही असं म्हणताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भावना अनावर झाल्या. अपघाताच्या कारणावरून सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांना रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्र्यांनीही फेटाळून लावलंय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुर्घटनेचं खरं कारण समजलं आहे आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांचीही ओळख पटली असल्याचं म्हटलंय. फक्त 5 सेकंदात पूल कोसळला नदीत, 1700 कोटी पाण्यात; थरारक VIDEO VIRAL बंगळुरू हावडा सुपर फास्ट एक्सप्रेस आणि शालिमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस अन् मालगाडी यांचा शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात एकूण 288 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. रेल्वे बोर्डाने रविवारी पत्रकार परिषद घेत कोरोमंडल एक्सप्रेसच्या चालकाची यामध्ये चूक नसल्याचं म्हटलंय. त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर तो मर्यादित वेग न ओलांडताच ट्रेन पुढे नेत होता असं स्पष्ट करण्यात आलंय. प्राथमिक तपासात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आल्यानंतरच अधिक बोलणे योग्य होईल असंही रेल्वे बोर्डाने सांगितलं.