पाटणा, 04 जून : बिहारच्या भागलपूरमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितीहानी झालेली नाही. पूल कोसळत असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काही जिवितहानी झाली नसली तरी पूल पडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. भागलपूर-सुलतानगंजमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या काही सेकंदात पूल गंगा नदीत कोसळल्याचं यामध्ये दिसतं. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा एक भाग कोसळला होता.
#WATCH | Under construction Aguwani-Sultanganj bridge in Bihar’s Bhagalpur collapses. The moment when bridge collapsed was caught on video by locals. This is the second time the bridge has collapsed.
— ANI (@ANI) June 4, 2023
(Source: Video shot by locals) pic.twitter.com/rZrqxvb9w7
गंगा नदीवर असलेला हा पूल 1717 कोटी रुपये खर्च करून बांधला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. वादळामुळे या पुलाच्या काही भागाचे एप्रिल महिन्यातही नुकसान झाले होते. भागलपुरच्या अगुवानी घाट ते सुल्तानगंज यांच्या दरम्यान या पुलाचे बांधकाम सुरू आहे. आता या पुलाचा मोठा भाग गंगा नदीत बुडाला. बांधकाम सुरु असलेल्या या पुलाचे सुपर स्ट्रक्चरच पाण्यात कोसळलं आहे. पुलाचा पाया नंबर 10, 11, 12 यावर उभा असलेलं सुपर स्ट्रक्चर कोसळलं. याचा भाग जवळपास १०० मीटरचा आहे. पुलाचे स्ट्रक्चर कशामुळे कोसळलं हे अद्याप समोर आलेलं नाही. भागलपूर पुलाचे बांधकाम एसपी सिंगला कंपनीकडून केलं जात आहे. यामुळे खगडिया आणि भागलपूर हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. बिहारमधला महत्त्वकांक्षी असा प्रकल्प असून त्याला पूर्ण होण्यास बराच काळ लागला आहे. पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झालं होतं. तर अप्रोच रोडचं कामही ५४ टक्के पूर्ण झालं होतं.