उद्धव ठाकरे विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये
बंगळुरू, 18 जुलै : लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना विरोधकांची रणनीती आखायला सुरूवात झाली आहे. याचाच भाग म्हणून बंगळुरूमध्ये विरोधकांच्या दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये देशभरातल्या 26 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा समावेश होता. या बैठकीतून उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘दुसरी यशस्वी बैठक झाली, तानाशाहीविरुद्ध जनता एकत्र झाली आहे. इंडिया, भारत ज्यासाठी आपण लढत आहोत त्याला घेऊन पुढे जाऊ. यासाठी आपण एकत्र आलो आहोत. वेगेवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत, राजकारणामध्ये विचारधारा वेगळी असली पाहिजे यालाच प्रजातंत्र म्हणतात. लढाई फक्त पार्टीची नाही. काहींना कुटुंबाची लढाई आहे असं वाटतंय, देश आमचा परिवार आहे त्यासाठी आम्ही लढतोय. परिवाराला आम्हाला वाचवायचं आहे. आमची लढाई पार्टी किंवा व्यक्तीविरुद्ध नाही, निती आणि तानाशाहीविरुद्ध आहे. स्वातंत्र्याची लढाई झाली होती. हे स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. यशस्वी होऊ याचा विश्वास आहे. जनतेच्या मनात भीती आहे, घाबरू नका आम्ही आहोत. एक व्यक्ती किंवा पार्टी म्हणजे देश नाही. देश म्हणजे जनता आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधकांची पुढची बैठक मुंबईमध्ये महाराष्ट्रात होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
विरोधकांच्या आघाडीचं नाव इंडिया विरोधी पक्षांच्या या बैठकीमध्ये आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आलं आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. या नावाचा फूलफॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance) आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं हे नाव टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत सुचवलं होतं.