दाम्पत्य
विरुधुनगर, 4 जुलै : गाव म्हटलं की तिथं समूह आला. वेगवेगळ्या जातीधर्मातील लोक आले. मात्र, तमिळनाडूमधील एका गावात फक्त एकच जोडपं राहतंय. एकेकाळी प्रचंड श्रीमंत असलेल्या या गावात आता मोडकळीस आलेली घरं, रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळते. अशा परिस्थितीतही एक जोडपं इथे शांततेत आयुष्य जगत आहे. परिसरात भुतांनी पछाडलेलं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाची अशी अवस्था का झाली आणि या जोडप्याने अजूनही गाव का सोडलं नाही, या बद्दल जाणून घेऊ या. कच्छंबट्टी हे विरुधुनगर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे. इथे 50 जुन्या मोडकळीस घरांचे अवशेष आणि ढिगाऱ्यांमध्ये फक्त एक वृद्ध जोडपं राहतंय. या गावाला एकेकाळी जमिनींचं गाव म्हटलं जायचं आणि या वृद्धांचे पूर्वज गावातील जमीनदार होते. काही दशकांपूर्वी या गावात पारंपरिक पद्धतीने बांधलेली 300 घरं होती. पण गेल्या जवळपास चार दशकांपासून आता इथं फक्त एकच जोडपं राहत आहे. सुभाषचंद्र बोस (75) आणि सुब्बुलक्ष्मी (71) असं या जोडप्याचं नाव आहे. काळाबरोबर जोडप्याने त्यांची संपत्ती गमावली. पण या जोडप्याला सुरुवातीला काय करायचं आहे याची कल्पना नव्हती. पण नंतर आपल्या गावाप्रती असलेल्या प्रेमामुळे त्यांनी या गावात एकटंच राहायचं ठरवलं. पण गावकरी गेले कुठे? गाव भूत का दिसत? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्यासाठी न्यूज 18 ची टीम गावात गेली. गावकरी भविष्यात एक ना एक दिवस फळं खायला गावात परततील या विश्वासाने आजोबा एका छोट्या आंब्याच्या रोपाला पाणी घालताना दिसले. दोघांनी टीमचं स्वागत केलं आणि आजी कॉफी बनवायला गेल्या. आजोबा प्रश्नांची उत्तरं देत म्हणाले, “हे गाव एकेकाळी खूप श्रीमंत होते, गावात वर्षातून शेतीचे दोन हंगाम व्हायचे, पण एकदा गावात दुष्काळ पडला. त्यामुळे उपासमारीची वेळ आली, परिणामी लोक उदरनिर्वाहासाठी इथून बाहेर जाऊ लागले. एक वेळ आली जेव्हा आम्ही दोघंच उरलो. आमची मुलंही निघून गेली. आम्ही सुरुवातीला गोंधळलो होतो; पण आम्ही हे गाव न सोडण्यावर ठाम राहिलो. आमच्याकडे एकेकाळी सर्व काही होते आणि आता आमच्याकडे काहीही नाही. आम्ही मजुरांप्रमाणे सामान्य जीवन जगतो. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी खूप धडपड करावी लागली, नंतर गावाच्या आजूबाजूला आढळणार्या औषधी वनस्पती गोळा करून परिसरातील गावकर्यांवर उपचार करू लागलो. यातून पैसे मिळू लागले. मला रूग्णांवर कमी खर्चात आणि कोणतेही दुष्परिणाम न करता फक्त औषधी वनस्पतींनी उपचार करायचे आहेत आणि म्हणून मी या गावात राहतो. आम्ही खूप वाईट परिस्थितीत राहत होतो आणि तुमच्यासारख्या माध्यमांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच टेलिकास्ट केल्या. आमची दुर्दशा पाहून विरुधुनगर जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला घर पुन्हा बांधण्यासाठी मदत केली आणि घराला पाण्याचं कनेक्शनही दिलं.” पुढे ते म्हणाले, “गरजेच्या वेळी त्यांनी (जिल्हाधिकारी) आम्हाला मदत केली म्हणून मी वैयक्तिकरित्या त्यांचे खूप आभार मानतो. आता आमची मुलं शहरात चांगली स्थायिक झाली आहेत. त्यांनी आम्हाला अनेकदा फोन करून त्यांच्यासोबत राहण्यास बोलवलं; पण आम्ही नकार दिला. तुम्ही कोणत्याही शहरात किंवा गावात राहू शकता पण तुम्ही फक्त तुमच्या मूळ गावातच शांततेने राहू शकता. मला आयुष्यात शांतता हवी आहे म्हणून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथेच राहीन.” हेही वाचा - आणखी एका बाबाची एंट्री! बागेश्वर धाम बाबा नंतर आता संतजी यांची चर्चा, पाहा ते नेमकं काय करतात? या गप्पा सुरू असतानाच आजी कॉफी घेऊन आल्या आणि टीमला कॉफी दिली. त्यांचे आभार मानून टीमने कॉफी घेतली. ती जगातील सर्वोत्कृष्ट कॉफीपेक्षा चांगली लागली कारण आजींनी ती प्रेमाने बनवली होती. आजी म्हणाल्या “गाव आता खराब झालेले रस्ते आणि मोडकळीस आलेली घरं यामुळे भुताने पछाडलेलं वाटतं. पण जेव्हा मी माझ्या पतीशी लग्न करून या गावात आले तेव्हा इथे 300 हून अधिक घरं होती. त्यानंतर शेतीची भरभराट झाली म्हणून आम्ही खूप सुखाने राहत होतो, पण नंतर दुष्काळामुळे परिस्थिती बदलली.” आजी पुढे म्हणाल्या, “आता आम्ही किराणा सामान घेण्यासाठी 20 किलोमीटर दूर असलेल्या जवळच्या छोट्या गावात जातो. आजूबाजूच्या गावातील लोक आम्हाला दररोज दूध आणून देतात, कारण त्यांना आमची काळजी आहे. आम्ही आठवड्यातून एकदा गावात जाऊन भाज्या खरेदी करतो. आम्हाला फक्त दारुड्यांचा धोका आहे म्हणून आम्ही रात्री आमच्या घराचे दरवाजे उघडत नाही. रात्रीच्या वेळी जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हाही आम्ही दोनदा विचारपूस करून पडताळणी करतो आणि नंतर घराचे दरवाजे उघडतो. मद्यपी नशेत असताना गोंधळ घालतात. त्यामुळे पोलिसांना आमची विनंती आहे की आमच्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवा जेणेकरून आम्हाला आरामात झोपता येईल.” एकेकाळी गावात पाहिलेली समृद्धी व भरभराटीच्या आठवणींसोबत हे जोडपं इथे राहतंय. त्यांना याच गावात शांततेत अखेरचा श्वास घ्यायचा आहे. न्यूज 18 च्या टीमने या जोडप्याचे आभार मानले आणि जड अंतःकरणाने गावाचा निरोप घेतला. आज आजोबा ज्या रोपट्याला रोज पाणी देत आहेत त्या रोपाचं झाड झाल्यावर आंबे तोडायला कोणीतरी येईल, अशी आशा मनात बाळगून न्यूज 18 ची टीम गाव शहराच्या दिशेने निघाली.