बरहमपूर : बऱ्याचदा दुचाकीच्या मागे कुत्रे लागतात असं पाहिलं असेल. अशावेळी त्यांच्याकडे लक्ष न देणं केव्हाही योग्य असं वारंवार सांगूनही पुन्हा तीच घटना समोर आली आहे. कुत्र्यांपासून जीव वाचवण्याच्या नादात भीषण अपघात झाला. दुचाकी उभ्या असलेल्या गाडीवर आदळली आणि तीन जण हवेत उडाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या मागे भटके कुत्रे लागले. ती आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पाहात जीव मुठीत घेऊन गाडी चालवत होती. त्याच वेळी तिची समोरून नजर बाजूला झाली आणि दुचाकी समोरच्या गाडीवर आदळली.
दुचाकी आदळल्याने तिघेही हवेत उडाले. यामध्ये एक लहान मुलगा देखील असल्याचं दिसत आहे. भटके कुत्रे स्कूटीचा पाठलाग करत होते. स्कूटीवर जोरात भुंकत होते. या अपघातात एक कुत्राही सापडला. हा अपघात झाल्यानंतर सगळे कुत्रे आपला जीव वाचवून पळून गेले. या अपघातात दोन महिला आणि लहान मुलगा जखमी झाल्याचं दिसत आहे. तर स्कूटीचं मोठं नुकसान झालं आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. ही धक्कादायक घटना ओडिशा इथल्या बेरहमपूर भागात घडल्याची माहिती मिळाली आहे.