स्मार्ट वॉटर सेव्हर
सिलिगुडी, 29 मार्च : पाण्याचा गैरवापर व अपव्यय हा साऱ्या जगासमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा असं तज्ज्ञांना वाटतं. त्यासाठी जगभरात निरनिराळे प्रयोगही होत आहेत. बागडोगरा इथल्या देबाशिष दत्त या विद्यार्थ्याने या संदर्भात संशोधन करून ‘स्मार्ट वॉटर सेव्हर’ नावाचं एक उपकरण तयार केलंय. त्याचा उपयोग करून पाण्याचा अपव्यय सहज टाळता येऊ शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. देबाशिष हा सिलिगुडी पॉलिटेक्निक कॉलेजचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तसंच आता तो पश्चिम बंगाल सायन्स फोरमच्या बागडोगरा विज्ञान बैठकीचा निमंत्रकही आहे. देबाशिषला लहानपणापासूनच वेगवेगळ्या कारची इंजिन उघडायची व त्यांच्या बारकाव्यांचा अभ्यास करण्याची सवय होती. तेव्हापासूनच त्याला यंत्रांबाबत विशेष आकर्षण वाटू लागलं. त्यानंतर त्यानं स्वतः काही मशिन्स बनवायला सुरुवात केली. भारतात अनेक घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये सध्या पंपाद्वारे टाकीत पाणी भरलं जातं; मात्र बऱ्याचदा घरातले किंवा सोसायटीतले लोक त्यांच्या कामाच्या नादात मोटार बंद करायला विसरतात. त्यामुळे टाकी पाण्यानं भरून वाहू लागते. भरपूर पाणी यात वाया जातं. वीजही वाया जाते. तसंच विनाकारण चालू ठेवण्याने पंपाचं आयुष्यही कमी होतं. यात सर्वांत जास्त नुकसान पाण्याचं होतं. भूजल पातळी आता कमी होत असल्याचं पर्यावरणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. जमिनीतलं पाण्याचं प्रमाण खूप जास्त वेगानं कमी होतंय. त्यामुळे आत्तापासून पाण्याची बचत करायला सुरुवात केली नाही, तर एक वेळ अशी येईल की पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही. याच विचारानं देबाशिष याने स्वतःचं पाणी बचतीचं मॉडेल तयार केलंय. बागडोगरा इथल्या खुदीराम पल्ली यांच्या घरी त्याचं हे नवीन संशोधन सादर करताना तो या उपकरणाची गरज व उपयोग सांगतो. हे उपकरण घरातल्या पाण्याच्या पंपाला जोडावं लागेल. पाणी टाकीत चढवताना त्या उपकरणावरचा दिवा लागेल. पाणी भरून झाल्यावर हा दिवा बंद होईल व पंपही बंद होईल. हे उपकरण बनवण्यासाठी केवळ एक हजार रुपये खर्च आला आहे. वाचा - रिक्षा चालवून गावातील मुलांसाठी उभारल्या 9 शाळा, अहमद अलींचं अनोख कामं याआधी त्यानं वेगळ्या प्रकारचे मोजे तयार केले आहेत. हे मोजे दिव्यांग आणि सांधेदुखी असणाऱ्या रुग्णांसाठी त्यानं बनवले होते. हे मोजे धागे आणि इलॅस्टिकनं जोडून तयार केले होते. त्यामुळे केवळ धाग्याच्या मदतीनं तो मोजा पायावर ओढला जातो. त्याव्यतिरिक्तही त्यानं चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्मार्ट अलार्म्स आणि सॅनिटायझिंग उपकरणं तयार केली आहेत. “भविष्यात पाण्याची समस्या गंभीर बनणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी मी उपकरण तयार केलं आहे. समाजाला उपयुक्त ठरणारी अशी उपकरणं मला तयार करायची आहेत. तसंच या उपक्रमाला व्यवसायात रूपांतरित करण्याची माझी इच्छा आहे,” असं देबाशिषचं म्हणणं आहे. देशात असे अनेक होतकरू तरुण समाजोपयोगी गोष्टी तयार करण्यासाठी कष्ट घेत आहेत. त्यांना बळ मिळाल्यास समस्या काही अंशी दूर होतील हे नक्की.