New Delhi: TMC member Supriya Sule at Parliament in New Delhi on Wednesday during the winter session. PTI Photo by Vijay Kumar Joshi (PTI12_14_2016_000064B)
नवी दिल्ली 03 डिसेंबर : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या प्रयोगाची देशपातळीवर चर्चा होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेसोबत एकत्र आल्याने भाजपला मोठा दणका बसला. या आघाडीचे शिल्पकार होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. त्यांनी एका मुलाखतीत गेल्या महिनाभरात घडलेल्या अनेक घटनांचा खुलासा केलाय. या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांची गाजली होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट. या भेटीत नेमकं काय झालं तेही पवारांनी सांगितलंय. खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती असं पवारांनी स्पष्ट केलंय. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या भेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही भेट ही दोन मोठ्या नेत्यांची होती. त्या भेटीत मी नव्हते. पंतप्रधानांनी मला मंत्रिपदाची ऑफर देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. महाराष्ट्रात राजकारणाशिवाय व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे असतात. ते कायम जपले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या.
मोदी आणि पवारांच्या भेटीत काय झालं? पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असं जे काही म्हटलं जातं ते खरं नाही. मात्र त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदं देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपसोबत जायचचं नसल्याने मी ती ऑफर नाकारली असा खुलासाही त्यांनी केला. एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या आधारे PTI ने हे वृत्त दिलाय.
शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो. आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला. ते म्हणाले राज्यात तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केलं तर चांगलं होईल. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं असं पंतप्रधानांना वाटत होतं. त्यांनीच तसा प्रस्ताव मांडल्यावर मी त्यांना स्वच्छ आणि स्पष्टपणे नाही असं सांगितलं.