ममतांच्या काँग्रेससमोर अटी आणि शर्थी
कोलकाता, 15 मे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठीचं मोठं विधान केलं आहे. काँग्रेस जिकडे मजबूत स्थितीमध्ये असेल तिकडे त्यांना पाठिंबा देऊ, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या विरोधी पक्षांच्या संभाव्य रणनितीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. जिकडे काँग्रेस मजबूत आहे, तिकडे त्यांना लढू द्या. आम्ही समर्थन देऊ, यात काहीही चूक नाही. पण त्यांना इतर राजकीय पक्षांनाही पाठिंबा द्यावा लागेल. समर्थन मिळवण्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांनाही समर्थन द्यावं लागेल, असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. जागा वाटप करताना प्रादेशक पक्षांना प्राथमिकता मिळेल जिकडे ते मजबूत आहेत, अशी अपेक्षाही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधलं भाजप सरकार गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तिथल्या लोकांना सलाम केला होता, पण त्यांनी काँग्रेसचं नावही घेतलं नव्हतं. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार? शिवकुमारनी अखेर मौन सोडलं मागच्या काही वर्षांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. जिकडे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिकडे भाजप लढू शकत नाही. जो पक्ष एखाद्या क्षेत्रात मजबूत असेल तिकडे मिळून लढलं पाहिजे. मी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं समर्थन करते, पण त्यांनी बंगालमध्ये माझ्याविरुद्ध लढल नाही पाहिजे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. मी 2024 साठी काँग्रेसचं समर्थन करायला तयार आहे, पण त्यांनी पश्चिम बंगालमध्ये माझं समर्थन करावं, एवढीच अट आहे. आम्ही गणित केलं आहे. काँग्रेस 200 जागांवर मजबूत आहे, तिकडे त्यांनी लढावं आम्ही त्यांचं समर्थन करू, पण त्यांना दुसऱ्या पक्षांचंही समर्थन करावं लागेल. मी कर्नाटकमध्ये तुमचं समर्थन करते, पण तुम्ही बंगालमध्ये माझ्याविरोधातच लढता, ही निती नसावी. तुम्हाला काही चांगलं मिळवायचं असेल, तर काही ठिकाणी तुम्हाला त्याग करावा लागेल, असं परखड मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.