बंगळुरू, 15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला, यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची उत्सुकता वाढली आहे. सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू असल्याचं बोललं जात आहे, त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीमध्ये आले आहेत. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मात्र तब्येतीचं कारण देत दिल्लीला येणं टाळलं आहे. मी औषधं आणि इंजक्शन घेतली आहेत, त्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही, असं शिवकुमार यांनी न्यूज 18 ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितलं. मी काँग्रेस हायकमांडचा भाग नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. निकाल आम्हाला मिळालेला आहे. सगळ्यांनी मला संधी देण्याची विनंती केली आहे, पक्ष अंतिम निर्णय घेईल. मला फक्त एक संख्या माहिती आहे, जी 135 आहे आणि ती काँग्रेसची आहे, डीके शिवकुमारची नाही. साहस असणारा व्यक्ती बहुमत बनवतो. मला कोणतीही संख्या माहिती नाही. वफादारीच्या बदल्यात वफादारी मिळेल, असं सूचक विधान शिवकुमार यांनी केलं आहे. मी सगळं काही हायकमांडवर सोडतो, मुळाशिवाय फळ मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे. शिवकुमार सगळ्यात श्रीमंत आमदार डीके शिवकुमार कर्नाटकचे सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. निवडणुकीवेळी फॉर्म भरताना शिवकुमार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यानुसार त्यांच्याकडे एकूण 1,413 कोटी रुपये आहेत. यामध्ये बँक खाती, जमीन, बॉण्ड्स, प्लॉट, सोनं, हिऱ्यांचे दागिने यांचा समावेश आहे. याशिवाय शिवकुमार यांच्याकडे लक्झरी गाड्याही आहेत. शिवकुमार यांच्या नेटवर्थमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये 68 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवकुमार यांनी 2018 साली त्यांची संपत्ती 840 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा 2013 च्या तुलनेत ही संपत्ती दुप्पट वाढली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.