! टेलरच्या मुलाने जजच्या परीक्षेत राज्यात काढलं नाव
सागर, 11 मार्च : जे प्रयत्न करतात ते कधीच पराभूत होत नाहीत, अशी एक म्हण प्रचलित आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही त्यांचा धैर्याने सामना केला पाहिजे. कठोर परिश्रमातून एक दिवस नक्कीच यश मिळते. मध्य प्रदेशमधील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाचा प्रवास असाच काहीसा आहे. या तरुणाने सातत्याने परिश्रम करून एका कठीण परीक्षेत यश मिळवलं आहे. एका गरीब टेलरच्या (शिंपी) मुलाने वारंवार अपयश येऊनही हार मानली नाही आणि शेवटी यशाला त्याने गवसणी घातलीच. परिस्थितीशी झुंज देणारा हा लढवय्या तरुण पाचव्या प्रयत्नात दिवाणी न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण झाला. या कठीण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे नाव अनिल नामदेव असून तो मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहगडचा रहिवासी आहे. अनिलने ओबीसी कोट्यातून राज्यात 10 वा क्रमांक मिळवला. परीक्षेत यश मिळवलेला अनिल मूळगावी पोहोचताच ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करत त्याचे स्वागत केले. यावेळी त्याची मिरवणूकही काढण्यात आली. अनिलचे वडील जगदीश नामदेव शाहगडमध्ये टेलरिंगचं काम करतात. आपल्या मुलाच्या यशाचा त्यांना अभिमान वाटतो. अनिलला जेव्हा मोठ्या थाटामाटात घरी आणलं जात होतं तेव्हा जगदीश आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दिवे लावून, रांगोळ्या काढून आपल्या मुलाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक होतं. वाचा - ग्रॅज्युएट उमेदवारांनो, ‘या’ विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; अर्जाला अवघे 2 दिवस 2017 पासून सुरू होते अनिलचे प्रयत्न या यशाबाबत अनिलने सांगितले की, ``कुणीही अपयशाची भीती बाळगू नये. राहिलेली कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत. आपण जर सातत्याने आणि एकाग्रतेने अभ्यास करत राहिलो तर यश नक्कीच मिळतं.`` अनिलने इंदूरमध्ये राहून सेल्फ स्टडी करत आणि घरगुती क्लासेस घेत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या गरजा भागवल्या. 2016 मध्ये लॉचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2017 पासून तो सातत्याने दिवाणी न्यायाधीश परीक्षेची तयार करत होता. अखेरीस 2021 मध्ये त्याला या परीक्षेत यश मिळालं.
अनिल शाहगडला पोहोचताच त्याने सर्वप्रथम त्याच्या आईला मिठी मारली. तेव्हा सर्व कुटुंबीय आणि अनिल भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते. अनिलचे वडील जगदीश नामदेव यांनी सांगितलं की, ``मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. कारण मी कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी कष्ट केले, त्याच्या आईने अंगणवाडीत काम करून त्याचे शिक्षण पूर्ण केलं, आज आमची सर्व मेहनत फळाला आली आहे.``