जालंधर (पंजाब), 3 एप्रिल : आजची सकाळ जालंधरवासीयांसाठी खूपच आनंददायी ठरली ती सकाळच्या त्या दृश्यामुळे. आताच्या पिढीने कधीही न पाहिलेली हिमालयाची शुभ्र रांग त्यांना गच्चीतून दिसली. हिमाचल प्रदेशात सुमारे 200 किमी लांब अशलेली धौलाधर पर्वतरांग पंजाबच्या जालंधर प्रांतातून दिसणं आजच्या काळात अशक्यच. जवळपास 30 वर्षांनी हिमालय दर्शन झाल्याचं लोक सांगतात. इतकं स्वच्छ आणि सुंदर दृश्य उभ्या आयुष्यात पाहिलं नसल्याचं लोकांनी सांगितलं.
Coronavirus चा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली गेली त्याचा आजचा नववा दिवस. संपूर्ण देशातली रस्त्यावरची वाहतूक मंदावली आहे. ट्रेन बंद आहेत, विमानं, कारखाने बंद आहेत. त्यामुळे हवा कमालीची स्वच्छ झाली आहे. रस्त्यावर गाड्याच नसल्यामुळे वातावरणातलं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे. याचा परिणाम मुख्यतः उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. म्हणूनच पंजाबच्या जालंधरमधून हिमालय दिसू लागला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराच्या परिसरात चक्क मोर दिसले. Lockdown चा सुखद धक्का! मुंबईत चक्क दिसले मोर, मायानगरीचं न पाहिलेलं चित्र हा भाग गिरगावच्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात आहे. रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याचा हा परिणाम आहे. कोरोनाव्हायरच्या लॉकडाउनचा हा चांगला परिणाम जगभर दिसला. पृथ्वीवरचं प्रदूषण या विषाणूच्या भयाने थोड्या दिवसांसाठी का होईना दूर झालं आणि आकाश मोकळं झालं.