त्याचं गाणं ऐकून हे नक्कीच प्रेमप्रकरण असावं, असा तर्क लावण्यात आला.
सच्चिदानंद, प्रतिनिधी पाटणा, 15 जुलै : सुप्रसिद्ध शोले चित्रपटातील प्रत्येक दृश्य आपल्या चांगलंच लक्षात असेल. त्यापैकीच बसंतीच्या प्रेमात वेडा झालेला वीरू पाण्याच्या टाकीवर चढतो, ते आठवतंय का? असंच एक दृश्य बिहारच्या पाटणा जिल्ह्यात पाहायला मिळालं. जीपीओ गोलंबरहून मीठापूरला जाणाऱ्या उड्डाणपुलावरील अशोकस्तंभावर एक तरुण चढला आणि काही केल्या खाली उतरण्याचं नाव घेत नव्हता. जवळपास 4 ते 5 तास तो एकाच ठिकाणी उभा राहून ‘दिल दिया है जान भी तुम्हे देंगे…’ हे गाणं गात होता. पाऊस आला, तरीही तो जागचा हलला नाही. लोकही त्याची मजा घेत होते. अशोकस्तंभावर चढलेल्या या तरुणाला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. काहीजण त्याला खाली उतरण्याची विनंती करत होते, काहीजण दम देत होते, मात्र कोणाचं काही ऐकण्याच्या तो मनस्थितीतच नव्हता. मग लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्याचं गाणं ऐकून हे नक्कीच प्रेमप्रकरण असावं, असा तर्क लावण्यात आला.
दरम्यान, पाटण्यात ठिकठिकाणी फार सुरेख कलाकृती बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक हे अशोकस्तंभ आहे. त्यावर चढलेला तरुण जे लोक त्याला खाली उतरण्याचा आग्रह करत होते. त्यांनाही वर बोलवत होता. काही वेळाने लोकच त्याला कंटाळले आणि बघ्यांची गर्दी कमी झाली. मग तरुणही आपोआप कंटाळून खाली उतरला.