LLB च्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
गाझियाबाद, 25 जून : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने खळबळ उडाली आहे. “तुझ्यापोटी माझ्यासारखी औलाद जन्माला आली, माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर आई” असा व्हिडीओ एका 21 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर अपलोड केला. यानंतर रात्री रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये अनस रेल्वे स्टेशनवर रील काढत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो आपल्या आईची माफी मागत आहे. गाझियाबादच्या लोणी भागात घडलेल्या या घटनेनंतर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. काय आहे प्करण? वास्तविक, लोणी परिसरात एलएलबीचा विद्यार्थी अनस (21 वर्षे) याचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे चालकाने याबाबत आरपीएफला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. लोणी परिसरातील निथोरा गावाजवळ रेल्वेखाली आल्याने अनसचा मृत्यू झाला. मृत तरुणाने शनिवारी सायंकाळी रेल्वे स्थानकातून दोन व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केले. एका व्हिडीओमध्ये अनस रील बनवून रेल्वे स्टेशनवर फिरताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मृत व्यक्ती आपल्या आईची माफी मागत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. वाचा - रक्षकच झाला भक्षक! लग्नाचे आमिष देऊन विवाहित महिलेसोबत अनेक महिने दुष्कर्म लोणी एसीपी रजनीश कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लोणी परिसरात रेल्वे रुळावरून एक ट्रेन गेल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून अनस असे त्याचे नाव आहे. त्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. या प्रकरणातील मृत्यूच्या कारणाबाबत संशय व्यक्त करत नातेवाईकांनी हा खूनही असू शकतो, असे सांगितले. त्यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी त्या तरुणाने एक व्हिडिओदेखील अपलोड केला होता ज्यामध्ये तो त्याच्या आईची माफी मागत होता. नातेवाइकांच्या आरोपांवरुन पोलीस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.