अखिलेश सोनकर, प्रतिनिधी चित्रकूट, 24 जून : पोलीस हे समाजाचे रक्षक असतात. मात्र, यातील रक्षक जर भक्षक झाला तर समाजाची रक्षा कोण करणार, असा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण यासंबंधीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने लग्नाचे आमिष देऊन अनेक महिने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या चित्रकूटमधील या प्रकाराने खळबळ उडाली आहे. ही घटना चित्रकूटच्या सरधुआ पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील आहे. पीडित महिला गर्भवती झाल्यावर याप्रकरणी खुलसा झाला. यानंतर पीडित महिलेने आरोपी शिपायाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. तर महिलेच्या या आरोपानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने आरोप करत सांगितले की, तिचा पती अनेक वर्षांपासून कमाईसाठी बाहेरगावी गेला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सरधुआ पोलिस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी हा तिच्या गावातील दुष्यंत सिंह नावाच्या व्यक्तीसोबत तिच्या घरी येत-जात होता. यादरम्यान ही महिला आणि नरेंद्र चौधरी एकमेकांच्या संपर्कात आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, आरोपी हवालदाराने लग्नाच्या आमिष देत 3 महिने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, शारिरीक संबंधांमुळे महिला गर्भवती राहिली. त्यामुळे आरोपीने 21 जून रोजी एका खासगी दवाखान्यात तिचा गर्भपात केला. महिलेची प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी तिची विचारपूस सुरू केली असता सगळा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पीडितेच्या पतीला कळल्यावर त्याने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्याचवेळी आरोपी हवालदारानेही या महिलेसोबत लग्न करायला नकार दिला. दोन्ही बाजूंनी महिला एकटी पडल्यानतर पीडित महिलेने सरधुवा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपी हवालदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. तपासानंतर आरोपी हवालदारावर कारवाई होणार, असे त्या म्हणाल्या आहेत. तर रक्षकच भक्षक झाल्यावर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित केला जात आहे.