दिल्ली, 9 फेब्रुवारी : चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरातून जगभर पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. फक्त चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 800 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता भारतालाही कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. कोरोनाव्हायरस सर्वात जास्त पसरण्याचा धोका असणाऱ्या 30 देशांच्या यादीत भारत सतराव्या स्थानी आहे. बर्लिनच्या हॅम्बोल्ट युनिव्हर्सिटी आणि रॉबर्ट कोच इन्स्टिट्युटच्या संशोधकांनी एक मॉडेल तयार केलं आहे. ज्याद्वारे एअर ट्रान्सपोर्टेशन पॅटर्नचं विश्लेषण करून चीनव्यतिरिक्त आणखी कोणत्या 30 देशांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे, हे माहिती करून घेतलं जाऊ शकतं. या मॉडेलनुसार चीनव्यतिरिक्त थायलँड, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये हा व्हायरस सर्वाधिक पसरला आहे तर भारतात दिल्ली एअरपोर्ट सर्वाधिक प्रभावित असून, त्यानंतर मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. हेदेखील वाचा - जपानच्या क्रुझला ‘कोरोना’चा विळखा; शेकडो भारतीयही अडकले देशात केरळमध्ये कोरोना विषाणूचे तीन रुग्ण आढळले आहेत. ते चीनमधल्या वुहान इथून आले होते. त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. आपण देखील परिस्थितीचा दररोज आढावा घेत आहोत, असे ते म्हणाले. चीनमधून येणाऱ्यांना सध्याचा व्हिसा आता वैध असणार नाही. तसंच लोकांना चीनचा प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरुसह देशातल्या 21 विमानतळावर तसेच बंदरांवर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 811 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण 37,000 लोकांना याची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 89 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हुबेई प्रांतात सर्वाधिक 81 लोकांचा समावेश आहे. तर 2 हेनान आणि हेबेई, हेइलोंगजियांग, अनहुइ, शानदोंग, हुनान आणि गुआंग्शी झुआंगमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवाय 2,656 नवीन प्रकरणं समोर आलीत. . सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या बातमीनुसार शनिवारी 600 लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्यात 324 हुबेई प्रांतातील होते. हेदेखील वाचा - नवरदेवाला झाला कोरोना, म्हणून वधू पक्षाने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. तेद्रोस अधनॉम यांनी सांगितलं की, “जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात एक आंतरराष्ट्रीय मिशन कोरोना व्हायरस प्रभावित चीनमध्ये पाठवण्यासाठी बीजिंगकडून सांगण्यात आलं आहे. त्यानुसार सोमवार किंवा मंगळवारी ही टीम रवाना होईल आणि त्यानंतर बाकीचे सदस्य जातील. या टीममध्ये यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे सदस्यदेखील असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे” तर दुसरीकडे एएफपीच्या बातमीनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आपात्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मायकल रेयान यांनी सांगितलं की, “चीनच्या हुबेई प्रांतात आलेल्या कोरोनाव्हायरचं प्रकरण काही प्रमाणात स्थिरावलं आहे, ही आनंदाची बातमी आहे. मात्र तरीदेखील काही भविष्यवाणी करणं योग्य ठरणार नाही”