या गावात होणाऱ्या प्रत्येक लग्नाची हीच तऱ्हा असते.
सत्यम कुमार, प्रतिनिधी भागलपूर, 2 जून : आपण आतापर्यंत बैलगाडीपासून हेलिकॉप्टरपर्यंत विविध प्रकारच्या लग्नवराती पाहिल्या आहेत, परंतु भरजरी कपड्यांमध्ये नवरीला कधी चालत सासरी जाताना पाहिलंय का? अहो, असं घडलंय बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात. ही वरात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. जाणून घेऊया नेमकं असं काय घडलं की नवऱ्याला आपली वरात चालत न्यावी लागली. हे प्रकरण आहे भागलपूर जिल्ह्यापासून 1 किलोमीटरवर असलेल्या नाथनगरच्या शंकरपूर गावातील. या गावचे रहिवासी सत्तो महतो यांच्या मुलीचं मनिहारी भागातील मुलासोबत लग्न झालं. हा विवाहसोहळा शंकरपुरात गुरुवारी पार पडला. नवरा गाडीने वरात घेऊन आला होता, मात्र त्याला वऱ्हाड्यांसह चक्क दीड किलोमीटर अंतर चालून मंडपात यावं लागलं. कारण नवरीच्या गावात गाडी जाईल असा पक्का रस्ताच नाहीये. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवरीलाही भरजरी कपड्यांमध्ये शुक्रवारी सकाळी दीड किलोमीटर अंतर चालत गावाबाहेर यावं लागलं. खरंतर या गावात होणाऱ्या प्रत्येक लग्नाची हीच तऱ्हा असते.
निवडणूक जवळ येताच शंकरपूर गावातील गावकऱ्यांसाठी एक भक्कम पूल बांधण्याचा मुद्दा प्रचंड तापतो. परंतु निवडणूक संपताच या गावाकडे कोणी बघतही नाही, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सोय म्हणून गावकरी स्वतःच गावातून वर्गणी काढून एक कच्चा पूल बांधतात. हा पूल दरवर्षी पुरात वाहून जातो, त्यानंतर त्याचं बांधकाम पुन्हा नव्याने करावं लागतं. त्यामुळे गावकरी आता अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. Ajit Pawar PC : …म्हणून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट महत्त्वाचं म्हणजे शंकरपूर गावातील मुलींचं लग्न लवकर ठरत नाहीत आणि ठरलेली लग्न मोडतात, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचं कारण हेच की, गावात गाडीदेखील जाऊ शकत नाही. गावकऱ्यांनी सांगितलं की, मुलींचंच नाही, तर मुलांची लग्न ठरवतानाही आमच्या नाकी नऊ येतात. आता निदान कच्चा पूल तरी आहे, परंतु पावसाळ्यात तर होडीच्या साहाय्यानेच दीड किलोमीटर अंतर पार करावं लागतं, कितीतरी वेळा याबाबत आवाज उठवला, पक्क्या पुलाची मागणी केली. मात्र कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.