जगातल्या अनेक देशांमध्ये वेग वेगळी लक्षणे दिसत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उपचार व्हायला पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं.
कोची 05 एप्रिल : कोरोनाविरुद्ध लढण्यात सगळ्यात आघाडीवर आहेत ते डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी. अपुरी साधनं, वाढते पेशंट्स असतानाही आपला जीव धोक्यात घालून ही मंडळी रूग्णांवर उपचार करत आहेत. केरळमध्ये एका 32 वर्षांच्या नर्सला उपचार करताना कोरोना झाला. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. तिने कोरोनावर मात दिली. आता ती 14 दिवस क्वारंटाइन राहणार असून पुन्हा त्याच वॉर्डमध्ये तिला रूग्णांच्या सेवेत परत यायचं आहे. तिच्या या धाडसाचं सरकारनेही कौतुक केलं आहे. केरळमधल्या कोट्टायम इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रेश्मा मोहनदास या नर्स आहेत. तिथल्या ज्येष्ठ नागरीकांच्या कोरोना वॉर्डमध्ये त्या ड्युटी करतात. कोरोना रूग्णांच्या सेवेत असतानाच त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातून त्या बऱ्या झाल्या. आता 14 दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे. पण रेश्मा यांनी न डगमगता अतिशय हिंम्मतीने त्याचा सामना केला. त्यांनी कोरोनावर मात केली. आता त्यांना पुन्हा त्याच वॉर्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी जायचं आहे. त्या सेवेतच मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो असं त्यांनी सांगितलं. केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी खास फोन करून रेश्माचं अभिनंदनही केलं आहे.
देशातले कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या 24 तासात 472 नवीन रूग्ण आढळून आलेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषद देण्यात आलीय. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या 3774 झाली आहे. आत्तापर्यंत 79 मृत्यू झाले असून गेल्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 267 जण आजारातून बरे झालेत. तर देशातल्या 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसल्याची माहितीही त्यांनी दिली.
लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे. सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन जेव्हढ्या काटेकोरपणे केलं जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश मिळेलं असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.