जयपूर, 7 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार माजला आहे. आतापर्यंत कोरोनाने (Covid - 19) देशात 4200 चा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मात्र देशातील असा एक भाग आहे जेथे कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. त्याचं नाव ‘भीलवाडा’. त्यामुळे येत्या काळात देशभरात ‘भीलवाडा मॉडेल’ (Bhilwara Model) लागू करण्याबाबत विचार केला जात आहे. राजस्थानमधील भीलवाडामधील कोरोना व्हायरससोबत लढा देण्याची पद्धती संपूर्ण देशात लागू होऊ शकतो. केंद्रीय कॅबिनेट मंत्री सचिव राजीव गौबा यांनी प्रदेशाचे मुख्य सचिव डीबी गुप्ता यांच्याकडे भीलवाडा मॉडेल संदर्भात सविस्तर माहिती मागवली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोट आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सांगण्यात आले आहे. गुप्ता यांनी सांगितले की कॅबिनेट सचिव गौबा यांनी भीलवाड्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरलेल्या उपायांचं कौतुक केलं आहे आणि हा मॉडेल देशभरात लागू करण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनी यासंदर्भात माहिती मागवली आहे. अमर उजालाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. संबंधित - WHOच्या ‘त्या’ एका चुकीमुळे पसरला कोरोना, आरोग्य संघटनेवर धक्कादायक आरोप काय आहे भीलवाडा मॉडेल प्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी सांगितले की, भीलवाडामध्ये कोरोनाचा कहर मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात पसरला ते व्हा सरकारने घराघरांमध्ये स्क्रीनिंग सुरू केली आणि तब्बल 18 लाख लोकांची तपासणी केली. यासाठी तब्बल 15000 टीम बनविण्यात आली. याशिवाय पहिल्यांना लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे सक्तीने पालन करण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तत्काळ आयसोलेट करण्यात आले. क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांच्या घराबाहेर पोलिसांना तैनात ठेवण्यात आलं. त्यामुळे ते घराबाहेर पडू शकले नाहीत. शर्मा यांनी सांगितले की, यापूर्वी जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी जे औषध वापरले होते, त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती मागितली होती. या औषधांमुळे अनेक रुग्ण बरे झाले. भीलवाडात एका डॉक्टरांना संसर्ग झाल्यानंतर तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत होती. मात्र त्यानंतर 27 कोरोना रुग्णांच्या वर हा आकडा गेला नाही. पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने येथे कर्फ्यू लावून सीमा सील करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व हॉटेलांमध्ये आयसोलेशनसाठी तयारी करण्यात आली होती. लॉकडाऊनचे कडक पालन केले जात होते. शिवाय घराघरांमध्ये स्क्रीनिंग सुरू होते. लोकप्रतिनिधी, मीडिया, सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींनाही शहरात प्रवेश दिला जात नव्हता. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचेही काही अधिकारी शहरात येऊ शकत होते. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे भीलवाड्यात कोरोनाचे रुग्ण वाढत नव्हते. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले. भीलवाड्यात गेल्या 17 दिवसांपासून कर्फ्यू सुरू आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून शहरात महाकर्फ्यू लावण्यात आला आहे. येथे 3000 पोलीस, 12 वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. संबंधित - ‘मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते’, तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी