एअर होस्टेस आत्महत्या प्रकरणातून आमदाराची निर्दोष सुटका
दिल्ली, 25 जुलै : हरयाणाचे माजी गृमंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल कांडा यांची 11 वर्षे जुन्या एअर होस्टेस आत्महत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे. 2022 मध्ये एअर होस्टेस गितीका आत्महत्या प्रकरणी दिल्लीतील रॉउज एवेन्यू कोर्टाने मंगळवारी निर्णय दिला. या प्रकरणातून गोपाल कांडा आणि अरुणा चड्डा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. गोपाल कांडा यांनी निकालानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. माध्यमांनी विचारले असता त्यांनी केवळ हात जोडले आणि निघून गेले. कांडा यांच्या वकिलांनी म्हटलं की, आम्हाला अशाच निकालाची अपेक्षा होती. गोपाल कांडा यांच्या एअरलाइन्समध्ये गितिका एअर होस्टेस होती. तिने ५ ऑगस्ट २०१२ मध्ये दिल्लीत अशोक विहारमध्ये घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. Seema Haider : ‘मांस खाणार नाही, गंगा स्नान करणार’, सचिनसोबत राहण्यासाठी सीमाचा नवा ड्रामा गितिकाने सुसाइड नोट लिहीली होती. त्यात तिने गोपाल कांडा आणि त्यांच्या कपंनीत सीनियर मॅनेजर असणाऱ्या अरुणा चड्डावर छळाचा आरोप केला होता. तिच्या आत्महत्येनंतर गोपाल कांडा यांना अटक केल्यानंतर १८ महिन्यांपर्यंत त्यांना तुरुंगात रहावं लागलं होतं. मार्च २०१४ मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. सहआरोपी अरुणा चड्डाला उच्च न्यायालयाने जामीन मिळाल्यानंतर कांडा यांनाही जामीन दिला होता. गितीकाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी तिची आई अनुराधा शर्मा यांनीही आत्महत्या केली होती. गितीका शर्माच्या आत्महत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गोपाल कांडा यांच्याविरुद्ध चार्जशीटमध्ये आयपीसी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याशिवाय त्यांच्यावर आयपीसीच्या सेक्शन १२० बी, २०१, ४६६, ४६८ आणि ४६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयाने कांडा यांच्याविरुद्ध ३७६ आणि ३७७ कलम हटवले होते. गोपाल कांडा हरयाणाच्या सिरसा जिल्ह्यातले आहेत. ते सिरसा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांनी हुड्डा सरकारला पाठिंबा दिला होता. त्याबदल्यात कांडा यांना हरयाणात गृहमंत्री करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये एअर होस्टेस आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानं गोपाल कांडा यांना राजीनामा द्यावा लागला होता.