नवी दिल्ली, 24 जुलै : अवैधरित्या वीजाशिवाय भारतात आलेली पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर सध्या यूपी एटीएसच्या रडारवर आहे. मला भारतामध्येच राहायचं आहे, कारण पाकिस्तानमध्ये गेले तर माझी हत्या केली जाईल, अशी भीती सीमाने व्यक्त केली आहे. तसंच सीमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आपल्याला पाकिस्तानला न पाठवता भारतीय नागरिकत्व द्यावं, अशी विनंती केली आहे. सीमा हैदरने न्यूज18 ला विशेष मुलाखत दिली. यामध्ये सीमाने आपण आता कधीच मांस खाणार नाही आणि लवकरच गंगेमध्ये स्नानही करू, असही सीमाने सांगितलं. ‘मला हाऊस वाईफ बनून राहायचं आहे, मला सासू-सासरे आणि सचिनची सेवा करायची आहे,’ अशी प्रतिक्रिया सीमाने दिली. एवढच नाही तर सीमाने मुलाखतीमध्ये सचिनसाठी खास गाणंही म्हणलं. ‘प्यार हमारा अमर रहेगा याद करेगा जहां, मैं मुमताज हूं तेरे ख्वाबों की,’ हे गाणं सीमाने गायलं. राष्ट्रपतींकडे दया याचिका सचिन मीणा या भारतीय नागरिकाच्या प्रेमात पडलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएस सीमाची कसून चौकशी करत आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयची गुप्तहेर असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. एटीएसच्या तपासादरम्यान सीमा हैदर आजारी पडली आहे. याआधी शुक्रवारी सीमा हैदरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका केली आहे, तसंच आपल्याला चार मुलांसोबत ग्रेटर नोएडामधला आपला साथी सचिनसोबत राहण्याची परवानगी द्या, अशी मागणीही सीमाने केली आहे. सीमा आजारी पडली सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांनी सीमाच्या वतीने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. ही दया याचिका राष्ट्रपती सचिवालयाला प्राप्त झाली आहे. या याचिकेत 30 वर्षांच्या सीमाने आपलं ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या सचिनवर प्रेम आहे, त्यामुळे आपण भारतात आल्याचं म्हणलं आहे. एवढच नाही तर आपण हिंदू धर्मही स्वीकारला आहे, असा दावा तिने केला आहे. नेपाळच्या काठमांडूमधल्या पशूपतीनाथ मंदिरामध्ये आपण हिंदू रिती-रिवाजांनुसार सचिनसोबत लग्न केल्याचंही सीमा म्हणाली आहे. यूपी एटीएसच्या तपासावेळी सीमा आजारी पडली असून तिला ग्रुकोज ड्रीप देण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. आपल्याविरुद्धच्या बातम्या ऐकल्यामुळे आजारी पडल्याचा दावा सीमाने केला आहे. ‘लोक माझ्याबद्दल चुकीचं का बोलत आहेत? यामुळे दु:ख होतंय. कुणीही एकदाही माझ्याबद्दल चांगलं बोललेलं नाही. मी आणि माझी चार मुलं भारतावरचं ओझं वाढवू, असं मला वाटत नाही. जर मला नागरिकत्व मिळालं, तर मी एक चांगली व्यक्ती बनून दाखवीन, मी विश्वासघात करणार नाही,’ असं सीमा हैदर म्हणाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.