प्रतिकात्मक फोटो
अलिपूरद्वार, 7 जुलै : निवडणूक म्हणजे वेगवेगळ्या वैचित्र्यपूर्ण घटना पाहायला मिळण्याचा एक कार्यक्रम असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत काही ना काही वेगवेगळं घडत असतं, मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा राष्ट्रपतिपदाची. पश्चिम बंगालमधल्या पंचायत समिती निवडणुकीत सध्या असंच एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. फालकाटा पंचायत समितीच्या 12 नंबरच्या वॉर्डमध्ये (जातेशार भाग) तब्बल 25 उमेदवार उभे राहिले आहेत. त्यापैकी 22 शिक्षक असून, ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. तसंच, त्यापैकी सात शिक्षक एकाच कुटुंबातले आहेत, ही त्याहून एक आश्चर्यकारक गोष्ट. एकाच कुटुंबातल्या एवढ्या व्यक्ती का बरं निवडणूक लढवत असतील? या प्रश्नाचं उत्तरही आश्चर्यकारक आहे. सरकारी शाळेत शिक्षक असल्यामुळे ते सरकारी कर्मचारी होतात आणि त्यांना निवडणुकीची ड्युटी लावली जाते. निवडणुकीची ड्युटी हा अनेकांसाठी कंटाळवाणा प्रकार असतो. ही ड्युटी टाळण्यासाठी शिक्षकांनी निवडणुकीला उभं राहायची शक्कल लढवली आहे. नियम असं सांगतात, की एखादी व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली, तर त्या व्यक्तीला निवडणूक ड्युटी करावी लागत नाही. त्यापैकी एका उमेदवाराने सांगितलं, ‘सध्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे काही प्रकार सुरू झाले आहेत, ते पाहता मला निवडणुकीची ड्युटी करायला भीती वाटते. म्हणून कुटुंबाचा विचार करून मी या वेळी निवडणुकीला उभा राहिलो आहे.’ एकाच कुटुंबातले सात जण या निवडणुकीला उभे राहिले आहेत. निवडणुकीच्या काळात त्या कुटुंबात विवाहसोहळा आहे. जिबन पाल यांनी सांगितलं, ‘माझ्या मुलाचं 5 जुलै रोजी लग्न आहे आणि 7 जुलै रोजी स्वागत समारंभ आहे. त्यामुळे मला घरी राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो आहे. अन्यथा निवडणूक ड्युटी लागली असती, तर मला ठरवून दिलेल्या बूथवर ड्युटीसाठी जावं लागलं असतं.’ अशाच पद्धतीने या कुटुंबातल्या अनेकांनी निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं. कारण त्या सर्वांना घरच्या लग्नाला हमखास उपस्थित राहायचं आहे. शिवाय घरात अंथरुणाला खिळलेली आईदेखील आहे. निवडणूक ड्युटी लागली असती, तर तिच्याकडे पाहणंदेखील अवघड झालं असतं. त्यामुळे या कारणानेदेखील त्यांनी निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला. अंजली पाल यांनी सांगितलं, ‘माझ्या सासूबाई अंथरुणाला खिळलेल्या असल्याने दोन व्यक्तींना कायम घरी राहावंच लागतं.’