मुंबई, 09 जुलैः शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने मुंबईला पुन्हा एकदा झोडपले असल्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. मुसळधार पावसाचा थेट परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर तर झालाच शिवाय अनेक सखल भागांमध्ये आता पाणी भरायलाही सुरू झाले आहे. कल्याण येथील शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठाण्यात गेल्या २४ तासात १८२.३७ मिलीमीटर पाऊस पडला असून या पावसात चार झाडं पडली. तसेच ठाण्यात अनेक सखल ठिकाणी पाणी भरायला सुरूवात झाली आहे. आज पहाटेपासून ठाण्यामध्ये जवळपास 26 मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी ठाण्यात यादरम्यान 1066 मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 700 मिलिमिटरचा पाऊस पडला आहे. ठाण्याशिवाय डोंबिवली पूर्वेला स्टेशन रोड, आगरकर रोड, एमआयडीसी निवासी विभाग या भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. तर भोपर गाव, आजदे गाव आणि इतर 27 गावांमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. गेल्या चार दिवसांपासून वाशिंद रेल्वे बोगदा पाण्याखाली गेल्याने चौथ्या दिवशीही 42 गावांचा वाशिंद शहराशी संपर्क तुटला आहे. शहापूर तालुक्यातील नद्यांची पुन्हा पातळी वाढली असून, नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस.. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे तर हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिरानं पळत आहे. पुढचे तीन दिवस असाच मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे. हेही वाचाः पश्चिम मुंबई, उपनगरांमध्ये ‘या’ ठिकाणी होतोय मुसळधार पाऊस महाराष्ट्राच्या ‘या’ भागांत हवामान खात्याने वर्तवला अतिवृष्टीचा इशारा थायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस