पंकजा मुंडे भाजप सोडणार? काय म्हणाले एकनाथ खडसे?
जळगाव, 25 जून : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भारत राष्ट्र समितीने त्यांच्या पक्षात यायची ऑफर दिली आहे. एवढच नाही तर त्या पक्षात आल्या तर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, असंही बीआरएसकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे एमआयएमनेही पंकजा मुंडे यांना पक्षात घेण्याची ऑफर दोन वर्षांपूर्वीच दिल्याचं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाकडूनही पंकजा मुंडेंना पक्षात यायची ऑफर मिळाली होती. पंकजा मुंडे यांना मिळत असलेल्या या ऑफरवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. भारत राष्ट्र समितीने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे या राज्यातल्या एक लोकप्रिय नेत्या आहेत, त्यामुळे पंकजा आपल्या पक्षात असाव्यात असं प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे, असंही खडसे म्हणाले. पंकजा इतर कोणत्याही पक्षात जायचा विचार करणार नाहीत, असं खडसे यांनी बोलून दाखवलं. अखेर अजित पवारांची ‘ती’ भीती खरी ठरली, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला दणका बसलाच! पंकजा मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला पंकजाताई आपल्या पक्षात असाव्यात असं वाटतं, जेणेकरून त्या पक्षाला बळ मिळू शकेल. पण पंकजाताई या कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार करणार नाहीत, असं मला वाटत आहे. त्या आहे तिकडे आतातरी व्यवस्थित आहेत. मुख्यमंत्रिपदाची ऑफर जरी दिली, तरी त्या बीआरएस पक्षात जाणार नाहीत, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. याच महिन्यामध्ये 3 जून महिन्यामध्ये एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली होती, त्यावेळीही वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगल्या होत्या. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गोपिनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची गोपिनाथ गडावर भेट झाली होती. मी खडसेंना चहाचं आमंत्रण दिलंय; त्या प्रसंगानंतर गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं!