(गेल्या 3 वर्षात रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यात घडलेल्या 4 भूस्खलनाच्या घटना)
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड, 21 जुलै : धरतीवरचा स्वर्ग समजला जाणाऱ्या आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या तसेच जैवविविधतेमुळे जागतिक स्तरावर महत्व असलेल्या कोकणातल्या सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांना गेल्या काही वर्षांपासून भूस्खलनाचा शाप लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 3 वर्षात रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यात घडलेल्या 4 भूस्खलनाच्या घटनांमध्ये 84 लोकांवर आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. कोकणात भूस्खलनाच्या वाढत्या घटना कशामुळे होतात. कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीमुळे तसंच सह्यद्रीच्या पोटातील खनिज उत्खननासाठी खोदल्या जाणाऱ्या खाणींमुळे याघटना घडत असल्याचे भूगोल तज्ज्ञांचे मत आहे. 30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यातल्या माळीणगाव दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता माळीणगावच्या या दुर्घटनेनंतर कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात भूस्खलनाच्या सततच्या घटनांनी अनेकांचा जीव गेला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गाव आणि वाड्या भीतीच्या छायेखाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धरतीवरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या निसर्गसंपन्न कोकणाला आता भूस्खलनाचा शाप लागल्याचे चित्रच पाहायला मिळत आहे.
22 जुलै 2021 च्या कालरात्री रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावावर डोंगर कोसळला आणि या दुर्घटनेत 49 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच दिवशी आणि त्याच वेळी म्हणजे 22 जुलै 2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पोसरे-बौद्धवाडीवर डोंगर कोसळून 17 जण झोपेतच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. याच दिवशी 22 जुलै 2021 रोजी खेड तालुक्यातीलच बिरमणी गावात डोंगराचा भाग एका घरावर कोसळून एकाच कुटुंबीयातील 2 जणांचा जीव गेला होता आणि आता 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावावर डोंगर कोसळून तब्बल 16 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. गेल्या तीन वर्षात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 84 जण भूस्खलनाचे बळी झाले आहेत. कोकणात भूस्खलनाच्या वाढत्या घटनांना जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. (Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट, रायगडमधील आणखी 103 गावं धोकादायक) कोकणात भूस्खलन होण्यामागचे मुख्य कारण तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केलं होतं. कोकणात बेसुमार होणारी वृक्षतोड हेच भूस्खलनाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी त्यावेळी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. कोकणात मुंबई तसंच इतर राज्यात स्मशानभूमीसाठी मोठ्या प्रमाणावर लाकडं हे कोकणातून पाठवली जातात. त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी लाकडांऐवजी विजेच्या विद्युत दाहिनी बसवण्याबाबत कोकणात कुऱ्हाड बंदी करण्यासाठी आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन देखील देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर या मागणीचे घोडे नेमके कुठे अडकले तेच समजले नाही. (देवा महाराष्ट्रावर रुसला का? इगतपुरीजवळ किल्ला धसला, घटनेचा LIVE VIDEO) निसर्गसंपन्न कोकणाला वाचवण्यासाठी आता कोकणात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वाढत चाललेल्या घटनांकडे गांभीर्याने बघणे गरजेचं आहे. माजी मदत व पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तर यांनी 2 वर्षांपूर्वी केलेल्या कोकण दौऱ्यात दरड प्रवण क्षेत्र असलेल्या गाव आणि वाड्यांना पुनर्वसित केले जाईल त्यासाठी सर्वे केला जाईल असे सांगितले तर माजी पालकमंत्री रवींद्र वायकर आणि भूगोल अभ्यासक प्राध्यापक डॉ. अनिता आवटी यांनी कोकणात होणारी बेसुमार वृक्षतोड जबाबदार असल्याचे निष्कर्ष काढले. महत्वाचं म्हणजे, ज्या ठिकाणी दरड कोसळली. भूस्खलन झाले ते सर्वेक्षणात नव्हते, कोकणात 70 टक्केभाग हा डोंगराच्या कुशीत आणि पायथ्याशी आहे मग किती गाव आणि वाड्यांचे स्थलांतर करणार आणि कुठे करणार असा प्रश्न समोर येतो त्यापेक्षा कोकणातील होणारी बेसुमार वृक्षतोडीला लगाम घालणे केव्हांही उचित ठरेल.