रायगड, 21 जुलै : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातल्या धोकादायक गावांबाबतची माहिती दिली आहे. रायगड जिल्हा आपत्ती प्रवण जिल्हा असून जिल्ह्यातील एकूण 103 गावे धोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. यामध्ये 9 गावे अतिधोकादायक,11 गावे धोकादायक मध्ये, तर 83 गावे अल्पधोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. या गावांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भेटी देवून तेथील सद्य:स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धोकादायक असलेल्या 20 गावातील नागरिकांना निवाराशेड मध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरित 83 कमी धोका असलेल्या गावांची पाहणी करुन त्यांच्यास्तरावर निर्णय घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना या गावासाठी पालक अधिकारी नेमणूक करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.
भविष्यात देखील हवामान खात्याकडून आँरेज आणि रेड अलर्ट देण्यात येतील त्याकाळात अतिधोकादायक गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात यावं, तसंच त्यांना जीवनावश्यक सर्व सुविधा तात्काळ पुरवण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त या 20 गावांमध्ये सायरन, सिग्नल, यंत्रणा तयार करण्यात यावी. याबरोबरच गावामध्ये सुरक्षित असे एकत्रित येण्याची ठिकाण निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे डॉ.म्हसे यांनी सांगितलं. इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम, एकूण 100 जवान, टीडीआरएफचे 80 जवान, स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदतीसाठी आले आहेत. स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. त्यातील सुमारे 17 ते 18 घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात 98 व्यक्तींना सुरक्षित वाचवण्यास यश आले आहे. 228 पैकी उर्वरित 109 व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिली आहे.