अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 17 जून: एखादी सुट्टी आली की अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. आपल्याला वर्ध्यात फिरायला जायचं असेल तर एक खास ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. ते म्हणजे पवनार हे होय. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम, पवनार नदी, धाम नदीतील विनोबांचं अग्निसंस्कार स्थान, त्यांची समाधी हे पाहण्यासाठी या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक येत असतात. तर स्थानिक लोकही नदीकाठी विरंगुळा, डब्बा पार्टीसाठी मैत्र मैत्रिणी, कुटुंबीयांसह आवर्जून येतात. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. पवनारला जायचं कसं ? वर्धा शहरापासून नागपूर मार्गावर 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर पवनार गाव वसलेले आहे. वर्धा जिल्ह्याच्या बाहेरून रेल्वेने येणार असाल तर वर्धा रेल्वे स्थानकावरून 30 ते 40 रुपये खर्चून रिक्षाने पवनार पर्यंत जाऊ शकता. तसेच पवनार हे गाव वर्धा नागपूर मार्गावर असल्याने बसने प्रवास करत असाल तर पवणार बस स्थानकावर देखील उतरता येते. वर्धा शहरातून स्वतःच्या गाडीने पवनार नदीकाठी पिकनिकला जायचं असेल तर वर्ध्यातील दादाजी धुनिवाले मठ चौक ते नागपूरच्या दिशेने जावे. प्रवास करत असताना दत्तपूर येथे नीलपंख पक्षाचा स्टॅच्यू दिसेल. तसेच मामा भांजा समाधी देखील त्या ठिकाणी आहे. या मुख्य मार्गावरून तुम्हाला सरळ जायचे आहे.
पवनार नदी आणि विनोबांचा आश्रम वर्ध्यापासून 8 किलोमीटरचा प्रवास केल्यावर पवनार गावचा छोटा आणि मोठा पूल दिसेल. पिकनिकच्या उद्देशाने जणाऱ्यांना जुन्या पुलावरून जावे लागेल. डाव्या बाजूने वळल्यावर पवनार नदी आणि आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. आश्रमात बघण्यासारख्या आणि अभ्यासण्यासारख्या अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. तसेच नदीकाठी बसून डबा पार्टीचा आनंदही घेता येतो. उन्हाळ्यात नदीत पाणी कमी सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीत पाणी अत्यंत कमी आहे. पूर्ण खडक उघडे पडले आहेत. उन्हाळ्यात पर्यटक कमी असले तरी सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक विरंगुळ्यसाठी किंवा करमणुकीसाठी येतात. पावसाळ्यात मात्र या ठिकाणी दुथडी भरून वाहणारी नदी बघण्याकरिता मोठी गर्दी दिसून येते. नदीला पूर आल्यावर नदीपात्रात असलेली समधीही दिसेनाशी होते. महाराष्ट्रातलं असं मंदिर पाहिलं नसेल, इथं जगभरातून पर्यटक येतात! VIDEO खाद्यपदार्थ वेधतात पर्यटकांचं लक्ष सहल म्हटलं की खाणं आलंच. पवनार येथील कच्चा चिवडा प्रसिद्ध आहे. नदीकाठी कच्चा चिवडाची दुकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे पर्यटक येथील कच्चा चिवडा आवर्जून खातात. तसेच पावसाळ्यात नदीकाठी गरमागरम चहाची देखील मागणी असते. त्यामुळे पवनार परिसर हा पर्यटनासाठी उत्तम पर्याय असून आपण एकदा तरी आवर्जून भेट द्यावी.