उद्धव ठाकरेंना संशय, सोबत असलेला खबरी कोण?
मुंबई, 18 जून : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईमध्ये पार पडलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी या शिबिरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली. शिवसेना वर्धापन दिनाच्या एका दिवसानंतर म्हणजेच मागच्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार गेले. या सगळ्यांवर उद्धव ठाकरेंनी तोफ डागली. ‘कागदावर पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाही. ना पक्षाचं नाव आहे ना चिन्ह. सगळी पदं भोगून सत्तेच्या मोहापायी लाचार मिंधे खोक्यासाठी पलीकडे गेले. आता माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. तरीही तुम्ही सोबत आहात. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला एक वर्ष होईल’, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला. ‘पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत, पण त्यांनी…’, उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान ठाकरेंना संशय शिवसेनेतल्या बंडाला एक वर्ष झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना आणखी काही जण साथ सोडतील असा संशय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. ‘अहमदशाह अब्दाली पानिपतच्या युद्धावेळी बाहेरून आला होता, फौजा घेऊन आला होता. टेकडीवरून मराठ्यांचं अथांग पण अठरा पगड जाती जमातींमध्ये विखुरलेलं मराठ्यांचं सैन्य बघत होता. अब्दालीने त्यांच्या खबऱ्यांना विचारलं, काय रे काय होणार? खबरे सगळीकडे असतात. कदाचित एखाद दुसरे इकडेसुद्धा असतील’, असं उद्धव ठाकरे म्हणाले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना नेमका कुणावर संशय आहे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 20 जूनला जागतिक खोके दिन..’ आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले ‘लंडनमध्येही..’