उद्धव ठाकरेंची पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका
जळगाव, 23 एप्रिल : उद्धव ठाकरे यांची जळगावच्या पाचोऱ्यामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण आहे. तसंच भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना याला काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागलं आहे. ‘मी गरिबांचा प्रधानसेवक आहे, बोलायला ठीक आहे. आमचं सरकार देणारं आहे, घेणारं नाही, असं मिंधे म्हणतात, पण काय देताय तुम्ही? इथल्या जनतेला विचारा, मी तुम्हाला जवळचा वाटतो का मिंधे गद्दार चोर तुम्हाला जवळचा वाटतो?’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर घणाघात केला. ‘काही तरी एक वारसा असतो, परंपरा असते. वैशाली आरोतात्यांचं काम घेऊन पुढे चालली आहे. काहीजण म्हणतील ही घराणेशाही आहे, असेल. पण घराणेशाहीमध्येही घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछ्या, तुला कुणी नाहीये. तू कधीही झोळी लटकवशील आणि निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातामध्ये भीकेचा कटोरा देऊन जाशील, त्याचं काय करायचं? मी फकीर आहे, झोळी लटकवून निघून जाईन. जाशील बाबा, पण माझी जनता भीकेचं कटोरं घेऊन फिरेल ना वणवण त्याचं काय? म्हणून काहीतरी घराण्याची परंपरा लागते, वारसा लागतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘सत्यपाल मलिक म्हणाले त्याच्याप्रमाणे यांनी निवडणूक प्रचारासाठी सैनिक मारले असतील, तर भारतमातेच्या सुपूत्रांचे जीव भाजपसाठी आपण उदारपणे ओवाळून टाकायचे? कारगीलच्या युद्धानंतर तेव्हाच्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं होतं, भाजप निवडणूक प्रचारामध्ये लष्कर प्रमुखांचे फोटो वापरतोय, कृपा करून तुम्ही वापरू नका. वाजपेयींनी ताबडतोब ऐकलं आणि ते फोटो काढून टाकले. तेव्हा हे पंतप्रधान असते तर लष्कर प्रमुखांच्या मागेही ईडी-सीबीआय लावली असती’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.