कल्याण, 19 जुलै : ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या पावसानं कल्याण -बदलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय. बुधवारी (19 जुलै) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे हा महामार्ग पाण्याखाली गेलाय. यापूर्वी देखील हा महामार्ग पाण्याखाली गेला होता. पण, प्रशासनानं त्यावर अद्यापही ठोस उपाय केला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. अंबरनाथ शहरातून जाणारा हा राज्य महामार्ग शेजारीच असलेल्या कारखान्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. ‘या कारखान्यांनी या रस्त्यावर असलेला नाला बुजवल्याने दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचते आणि वाहतुकीला खोळंबा निर्माण होतो, अशी माहिती नागरिकांनी दिली. त्यानंतर ही वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवली जाते मात्र तेथेही संथगतीने ही वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो असं त्यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे राज्य महामार्गाच्या बाजूला असलेल्या कारखान्यांनी राजरोसपणे मुख्य नाला अरुंद केले आहेत. तर काही कारखान्यांनी चक्क नालाच वळवला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी येत असल्याचा दावा नागरिकानी केला. पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की या पाण्यात काही वाहने बंद देखील पडली होती. तर काही वाहनांनी या भर पाण्यातून मार्ग काढत बदलापूर गाठले. या पावसामुळे कल्याणमधील खाडीपात्रातही वाढ झालीय. डोंबिवली पावसानं तुंबली, स्टेशनजवळचा परिसर गेला पाण्याखाली, पाहा Video डोंबिवलीला तडाखा डोंबिवली स्टेशन परिसर पाण्याखाली गेला होता. या भागात नेहमी फेरीवाल्यांचं राज्य असतं. पण, पावसामुळं इथं सर्वत्र पाणीच पाणी साचलं होतं. डोंबिवलीत अनेक ठिकाणी मोठी झाडं कोसळून पडली. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे स्टेशन परिसरातल्या दुकानातही पाणी शिरले. त्यामुळे दुकानदार आणि तिथं खरेदीसाठी आलेल्या डोंबिवलीकरांचीही तारांबळ उडाली.