देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे
नागपूर, 23 फेब्रुवारी : निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानं शिंदे गटात उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. पक्षाच चिन्ह हातून गेल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. आता ठाकरे गटाकडून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात धडक दिली जाणार आहे. विदर्भात ठाकरे गटाची पडझड रोखण्यासाठी शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. ‘25 फेब्रुवारीपासून शिवसंवाद’ला सुरुवात ठाकरे गट 25 फेब्रुवारीपासून विदर्भात शिवसंवाद यात्रेचं आयोजन करणार आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं नागरिकांसोबत संवाद साधला जाणार आहे. पक्षाचं चिन्ह असलेलं धणष्यबाण आणि पक्षाचंं नाव हातून गेल्यानंतर ठाकरे गटाचा हा पहिलाच विदर्भ दौरा असल्यानं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
अरविंद सावंतांचा विधानसभानिहाय आढावा पक्षाचं चिन्ह आणि नाव गेल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकून पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ठाकरे गटाकडून विदर्भात शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या काळात खासदार अरविंद सावंत हे विधानसभानिहाय आढावा घेणार आहेत.