मुंबई, 06 एप्रिल: सध्या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Corona Patients in Maharashtra) आढळत आहेत. असं असताना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लसीकरण मोहिमेला (Corona vaccination) वेग दिला आहे. मागील आठवड्यापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. राज्य सरकारच्या दाव्यानुसार, आतापर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. दरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काल 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 4 हजार 243 केंद्रांवर तब्बल 4 लाख 30 हजार 592 नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 72 लाख 98 हजार 206 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 8 लाख 19 हजार 042 लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत 7 कोटी 22 लाख 77 हजार 309 लोकांना पहिला डोस दिला आहे, तर 1 कोटी 8 लाख 33 हजार लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दोन्ही डोस दिलेल्या लोकांची संख्या 8 कोटी 31 लाख 10 हजार इतकी आहे. मागील आठवड्यात राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पन्नास हजाराच्या जवळपास गेला होता. त्यानंतर आता राज्यात दिवसाला 47 हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. (हे वाचा- ‘कोरोनाची लाट आधीपेक्षा मोठी’,राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना ) तर मुंबईमध्ये दररोज 10 हजाराच्या आसपास नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईसह ठाणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर आणि पुणे या प्रमुख शहरांमध्येही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाही याला अपवाद नाही. याशिवाय महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरा होण्याची सरासरी टक्केवारी घसरली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 95 टक्के लोकं कोरोनावर यशस्वीपणे मात करत होती. पण आता महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 82.84 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे राज्यात मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. (हे वाचा- 25 वर्षांपुढील सर्वाना लस द्यावी, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी ) सध्या राज्यात दिवसा जमावबंदी ते रात्री 8 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर कठोर निर्बंधही लादण्यात आले आहेत. असं असलं तरी महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढतच जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. सध्या राज्यात 45 वर्षांपुढील सर्वांना सरसकट लसीकरण देण्यात येत असून 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात यावी अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.