मुंबई, 06 एप्रिल: मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांची कृष्णकुंजवरून पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काय चर्चा झाली याबाबत भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे असं म्हणाले की काल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली. लॉकडाऊनबाबत भेटण्याासाठी मी त्यांना विनंती केली होती, पण त्यांच्या आजुबाजूल कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने ते क्वारंटाइन आहेत. त्यामुळे आमच्यात झूमवर बोलणे झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी काय बोलणं झालं हे सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी असल्याची चिंता राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी जास्त का? याबाबतही राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
'पुन्हा एकदा लॉकडाऊन पसरलं आहे आणि पेशंट्स वाढत आहेत. किंबहुना (हा शब्द वापरला तर चालेल ना) आधीच्या लाटेपेक्षा ही लाट मोठी आहे', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. हे चित्र महाराष्ट्रातच का दिसंतय याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. याठिकाणी बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर राज्यांमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना किंवा कोरोनाची लाट नाही आहे. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र आहे. याचं एक कारण म्हणजे महाराष्ट्रात बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसंच इतर राज्यांत कोरोनाचे रुग्ण मोजले जात नाहीत. ते मोजले तर खरे आकडे समोर येतील.'
या समस्येबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'मी मागणी केली होती की, जे लॉकडाऊनमध्ये बाहेरच्या राज्यात गेले आहेत ते परतले की त्यांची मोजणी करा आणि चाचणी देखील करा की यांना कोरोना नाही ना. ही चाचणी तर नाही झाली आणि त्यांची मोजणी देखील झाली नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरं काहीतरी असेल, हे दृष्टचक्र चालूच राहील. कुणीही येतंय आणि जातंय, महाराष्ट्रातील नागरिक घरात अडकून पडला आहे हे चित्र चांगलं नाही '
(हे वाचा-काय घडलं ठाकरे बंधूंच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये? राज ठाकरेंच्या 10 सूचना)
राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाबतीत तक्रारी आणि सूचना आल्याचं राज ठाकरे म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा नाही तर सूचनांचा पाढा वाचल्याचे राज ठाकरे म्हणाले. अर्थव्यवस्था कोसळली आहे, समाजमनही कोसळेल- त्यानंतर आपल्या हातात काय शिल्लक राहील असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
उत्पादनाबाबत- जे छोटे व्यापारी आहेत त्यांना उत्पादन सुरू ठेवण्यास सांगितलं आहे पण विक्री न करण्यास करण्यास सांगितलं आहे. असं केलं तर ते उत्पादन ठेवायचं कुठं असा प्रश्न आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन दिवस विक्री सुरू ठेवण्याची सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे. तसंच छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरू करण्यास परवानगी द्या.
बँकांविषयी- या सगळ्या दिवसात व्यवसाय बंद आहेत. अनेकांनी कर्ज घेतली आहेत. पण लोकांकडे पैसे असतील तर ते पैसे बँकांकडे परत जातील. राज्य सरकारने सर्व बँकांशी बोलून घ्यावं. कारण अनेक ठिकाणी त्याची सक्तीने वसुली केली जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, अशावेळी हप्ते कसे भरावे?
वीजबीलविषयी- या संपूर्ण लॉकडाऊन काळात वीजबील सरसकट माफ करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
जिम-सलून 2-3 दिवस सुरू ठेवण्याची सूचनाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj thackarey