अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 17 मे : राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा संबंध हा माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जोडण्याचा प्रकार काही नवा नाही. राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांचे नाव आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यामुळे शरद पवारांचं नाव आता चर्चेत आलंय. सोलापूरच्या दत्तात्रय गाडगे यांनी त्यांच्या बागेतील आंब्याला चक्क शरद पवारांचं नाव दिलं आहे. गाडगे यांच्या बागेतील 20 ते 25 झाडांवर विशेष प्रयोग केला. या झाडाचा एक आंबा तब्बल अडीच किलो वजनाचा आहे. या आंब्याला त्यांनी शरद मँगो म्हणजेच शरद पवार आंबा असं नाव दिलंय. सोलापूरमध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवात या शरद मँगोची जोरदार चर्चा आहे.
शरद पवारांचं नाव का? गाडगे यांनी या आंब्याला शरद पवारांचं नाव का दिलं याचं कारणही सांगितलंय. ‘शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी फळबाग योजना सुरू केली. या योजनेतून आम्ही 8 एकर शेतजमिनित जवळपास 7 हजार केशर आंब्याची रोपं लावली. त्यामुळेच अडीच किलो वजनाच्या या विशेष आंब्याला पवारांचं नाव दिलंय,’ असं गाडगे यांनी स्पष्ट केलं. तोंडाला सुटेल पाणी, अशीही सोलापुरची खिमा-भाकरी, VIDEO कसा तयार केला आंबा? आंबा महोत्सवात शरद मँगो हा त्याच्या नावाप्रमाणेच वजनामुळेही लक्ष वेधून घेतोय. गाडगे यांनी यावेळी हा आंबा तयार करण्याची पद्धतही सांगितली. ‘आमच्या शेतामध्ये आम्ही प्रामुख्यानं केशर आंब्याचं उत्पादन घेतलंय. या आंब्यांच्या झाडावर होमिओपॅथीच्या वेगवेगळ्या औषधांचा वापर केला. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या राजेंद्र पवार यांनी यामध्ये अधिक संशोधन केले. या संशोधनातून पिकांवर होमिओपॅथी औषधांचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि अडीच किलो वजनाच्या आंब्याचे भरघोस उत्पादन झाले. बारामती कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी आंबा महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्याचं नामकरण शरद मँगो असं केलं, ’ अशी माहिती गाडगे यांनी दिली.