ठाकरेंना आणखी एक धक्का? निकटवर्तीयाचं सूचक ट्वीट
मुंबई, 12 जून : शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का? अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत, याचं कारण म्हणजे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेल्या नेत्याचं सूचक ट्वीट. युवासेनेचे नेते राहुल कनाल युवासेनेमध्ये नाराज आहेत का? अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत, त्यातच राहुल कनाल यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. ‘मैं खुद अकेला रह गया, सबका साथ देते देते,’ असं राहुल कनाल म्हणाले आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आहे. याआधी राहुल कनाल युवा सेना कोअर कमिटीच्या व्हॉट्सऍप ग्रुपमधूनही लेफ्ट झाले होते. अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल यांनी ग्रुप सोडल्याचं बोललं गेलं होतं.
उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना शिर्डी संस्थानावर सदस्य म्हणूनही राहुल कनाल यांची वर्णी लागली होती. युवा सेनेतल्या अमेय घोले, सिद्धेश कदम आणि समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राहुल कनाल हे वांद्रे पश्चिममधून विधानसभेची तयारी करत होते. तसंच आदित्य ठाकरेंसोबत त्यांनी कोरोना काळात दिवस रात्र काम केलं होतं. राहुल कनाल बीएमसीच्या शिक्षण समितीचे सदस्यही होते. तसंच आय लव्ह मुंबई फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. माध्यमांमधल्या वृत्तांनुसार राहुल कनाल यांचे सलमान खानसोबत कौटुंबिक संबंध आहेत. तसंच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पासून ते विराट कोहली राहुल कनाल यांचे मित्र आहेत.