JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'केंद्र सरकारची सारवासारवी', लॉकडाऊन टाळा या मोदींच्या सल्ल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल

'केंद्र सरकारची सारवासारवी', लॉकडाऊन टाळा या मोदींच्या सल्ल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी लाइव्ह येत जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावेळी त्यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी लाइव्ह येत जनतेशी संवाद साधला. दरम्यान यावेळी त्यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी लॉकडाऊनपासून (Lockdown) वाचण्यावरच भर दिला होता. लॉकडाऊन लागू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र महाराष्ट्रात लॉकडाऊनची अत्यंत आवश्यकता आहे या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. या लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत असे म्हटले आहे की, ‘पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे संकट मोठे आहे. कोरोनाचे जणू तुफानच आहे, पण तुफानापासून बचाव कसा करायचा यावर उपाय त्यांनी सांगितला नाही. लोकांनी आपले आप्त गमावले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले, पण यापुढे ‘बळी’ वाढणार नाहीत याबाबत तुम्ही काय करताय? महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे. सारवासारवीने काय होणार!’ ‘मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किमान 15 दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करा, अशी राज्याच्या अनेक मंत्र्यांची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय तो निर्णय घेतीलच, पण ‘‘लॉक डाऊन टाळा’’ असा सल्ला आपले पंतप्रधान कोणत्या आधारावर देत आहेत?’ असा सवालही शिवसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, त्याबाबत देखील नमुद केले आहे. हात लावू तिथं कोरोना आहे, ही परिस्थिती चिंताजनक असल्याचं या लेखात म्हटलं आहे. (हे वाचा- COVID-19: सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू ) इतर राज्यातही कोरोनाची परिस्थिती इतकीच बिकट आहे. काही राज्यातून लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना शिवसेनेच्या मुखपत्रात पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त करण्यात आली आहे. ‘गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून गुजरात सरकारने दोन आठवडय़ांचे लॉक डाऊन लागू करावे अशी शिफारस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात कडक निर्बंध लावूनदेखील कोरोना नियंत्रणात येत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरते आहे. त्यामुळे लॉक डाऊन हीच अत्यावश्यक सेवा बनली आहे. अशा गंभीर परिस्थितीशी सामना कसा करावा याबाबत पंतप्रधान जनतेला दिलासा देतील असे वाटत होते’, अशी प्रतिक्रिया मांडण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेच्या मोडलेल्या घडीवरूनही शिवसेनेने पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. शिवाय भाजपच्या पश्चिम बंगालमध्ये झालेल्या प्रचार सभांवरून देखील त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर शिवसेनेने अशी प्रतिक्रिया मांडली आहे की, ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा पोर्तुगालचा नियोजित दौरा रद्द केला हे ठीक झाले; पण त्यांनी प. बंगालातील गर्दीच्या निवडणूक सभा वेळीच आवरल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग थांबवता आला असता. प. बंगालातील प्रचारासाठी भाजपने देशभरातून लाखो लोक गोळा केले. ते कोरोनाचा संसर्ग घेऊन आपापल्या राज्यांत परतले. त्यातील अनेक जण कोरोनाने बेजार आहेत.’   या सभांमुळेच कोरोनाचा प्रसार अधिक झाला अशी टीका शिवसेनेकडून केली जात आहे. हरिद्वारचा कुंभमेळा आणि प. बंगालचा राजकीय मेळा यातून देशाला फक्त कोरोनाच मिळाला असा हल्लाबोल शिवसेनेकडून केला जातो आहे. (हे वाचा- Remdesivir वरून पुन्हा केंद्र Vs राज्य सरकार, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी ) महाराष्ट्रात कोरोना (Corona) संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनचा (maharashtra lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या