संजय राऊतांचा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा
मुंबई, 3 एप्रिल, गेल्या काही दिवासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातील एका प्रकरणात गुजरात हाय कोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजारांचा दंड ठोठवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण किती झाली आहे, पदवी दाखवा अशी मागणी केली होती. मात्र या प्रकरणात सुनावणी करताना काही दिवसांपूर्वी गुजरात हाय कोर्टानं केजरीवाल यांना चांगलंच फटकारलं. तसेच त्यांना 25 हजारांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राऊतांचा खोचक टोला आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. ‘काही लोक माननीय पंतप्रधानांची पदवी खोटी असल्याचं म्हणत आहेत. पण पंतप्रधानांची पॉलिटिकल सायन्समधील पदवी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, यावर माझा प्रामाणिक विश्वास आहे. त्यामुळे आता ती पदवी आमच्या नवीन संसद भवनाच्या भव्य प्रवेशद्वारावर प्रदर्शित केली जावी, जेणे करून लोक शंका उपस्थित करणार नाहीत’ असं राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.