JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update: पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांनो, शेताची अशी घ्या काळजी, Video

Weather Update: पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांनो, शेताची अशी घ्या काळजी, Video

Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेताची अशी घ्यावी काळजी..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 8 जुलै : सध्या मान्सून सर्वत्र सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर , सांगली आणि सातारा जिल्ह्यात देखील पुढील काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या काळात कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना पेरणी संदर्भातील सूचनाही करण्यात आल्या आहेत. काय असेल पावसाची स्थिती? प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 08 ते 12 जुलै दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 27 अंश ते 30 अंश तसेच किमान तापमान हे 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याकाळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 8 व 9 जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 10 ते 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी… कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आजरा, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा करवीर आणि शाहूवाडी तालुक्यातील पुरेसा पाऊस झाला असल्यास शेतकरी बांधव भात व नाचणी रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर पेरणी करू शकतात. तसेच पुरेसा वाफसा असल्यास मका, सोयाबीन व भुईमुग पिकाची पेरणी करू शकतात. शेतकरी बांधवांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. सांगलीतील शेतकऱ्यांसाठी.. सांगली जिल्ह्यात दिनांक 08 ते 12 जुलै दरम्यान कमाल तापमान 28 ते 30 अंस सेल्सिअस तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याकाळात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 8 व 9 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसाळ्यात जनावरांचं कसं करायचं लसीकरण? जाणून घ्या ही महत्वाची माहिती Video सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी.. सातारा जिल्ह्यात दिनांक 08 ते 12 जुलै दरम्यान कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस तसेच किमान तापमान हे 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर या काळात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तसेच घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जावली, पाटण, महाबळेश्वर व वाई तालुक्यातील घाट भागातील शेतकरी बाधवांनी पुरेसा पाऊस झाला असल्यास भात रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर पेरणी करण्यास हरकत नाही. तसेच वाफसा असल्यास मका, सोयाबीन व भुईमुग पिकाची पेरणी करण्यास हरकत नाही. शेतकऱ्यांनी ही घ्यावी काळजी.. शेतकरी बांधवांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नये. जनावरांना तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रोग प्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. खरीप हंगामामध्ये पेरणीकरिता बियाणे हे शासन मान्य बियाणे विक्री केंद्रे अथवा कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्राकडून खरेदी करावे. पेरणी केलेल्या पिकांमध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकांची घ्या काळजी भात - खरीप हंगामामध्ये भाताची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करणेकारिता गादी वाफे तयार करून घ्यावेत. पेरणीसाठी 1 मी. रुंदीचे 15 सेमी उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. तर वाफे तयार करताना गुंठा क्षेत्रास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खताबरोबर 500 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद व 500 ग्रॅम पालाश हि खते चांगल्या प्रकारे मातीत मिसळावीत. भात लागवडीसाठी पुढील वाणांची निवड करावी :- • हळवा : कर्जत-184, रत्नागिरी-1, कर्जत-4, फुले राधा • निमगरवा : फुले समृद्धी • गरवा : रत्नागिरी-2, कर्जत-2 • सुवासिक वाण : बासमती 370 इंद्रायणी, भोगावती, सुगंधा • संकरीत : सह्याद्री-1, सह्याद्री-4, सह्याद्री-5 पाण्याचा खात्रीशीर स्रोत उपलब्ध असल्यासच भात रोपवाटिका तयार करण्यास सुरवात करावी. नाचणी - खात्रीशीर पाण्याची उपलब्धता असल्यास नाचणी पिकासाठी रोपवाटिका तयार करण्यासाठी पेरणी सुरवात करावी. • गादीवाफा : साधारणत 1 ते 1.5 मी रुंद आणि 8 ते 10 सेमी उंच व उतारानुसार लांबी ठेऊन तयार करावेत. दर चौमी क्षेत्रावर ३ किलो याप्रमाणे शेणखताचा थर द्यावा आणि प्रती गुंठ्यास 1 किलो युरिया द्यावा. • बियाणे : 7 ते 8 सेंमी अंतरावर ओळीत 1 ते 2 सेमी खोल बियाणे पेरून हाताने झाकावे. पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रती गुंठा १ किलो युरिया द्यावा एक एकर रोप पुनर्लागवडीकरता 2 ते 3 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. • सुधारित वाण : फुले नाचणी, फुले कासारी खरीप ज्वारी - नैऋत्य मान्सूनचा चांगला पाऊस असल्यास व वापसा येताच पेरणी करावी. जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगाममध्ये ज्वारी पिकाची पेरणीसाठी पुढील वाणांची उपलब्धता करून घ्यावी. • संकरीत वाण : सी.एस.एच.-5, सी.एस.एच.-9. सी.एस.एच.-13, सी.एस.एच.-14, बायो 9544 • सुधारित वाण : एस.पी.व्ही.-462, सी.एस.व्ही.13, सी.एस.व्ही.-15, पी.व्ही.के.-801 • गोड ज्वारी : एस.एस.व्ही.-८४. सी.एस.व्ही.-24, फुले वसुंधरा (संकरीत) हे वाण वापरावे. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो सुधारित बियाणे वापरावे पेरणी करण्यापूर्वी 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम या प्रमाणे ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्फिरीलम हे जीवाणू खत चोळावे. खरीप ज्वारी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. मका - जमिनीमध्ये पुरेसा वापसा आल्यास मका पिकाची पेरणी करावी. खरीप हंगामामध्ये मका पिकाच्या पेरणीसाठी पुढील वाणांची उपलब्धता करून घ्यावी. • लवकर पक्व होणारे : पुसा संकर मका-1, विवेक संकरित मका-21, विवेक संकरित मका-27, महाराजा • मध्यम कालावधीत पक्व होणारे : राजर्षी, बायो 9637, फुले महर्षी, बायो 9544 • उशिरा पक्व होणारे बायो 96 81 एच.क्यू.पी.एम.-1, संगम आणि कुबेर • हिरव्या चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल • मधु मका : फुले मधू, एस 75 सोयाबीन - खरीप हंगामामध्ये सोयाबीन पेरणी वाफसा आल्यानंतर करावी. खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी फुले किमया (केडीएस 753 ) फुले संगम (केडीएस 726 ) फुले अग्रणी (केडीएस 344 ), फुले कल्याणी (डिएस 228 ), जेएस 335 या वाणांची उपलब्धता करून घ्यावी. • आंतरपिके : सोयाबीन तूर (3:1) सलग पेरणीसाठी 75 ते 80 किलो प्रति हेक्टर तर टोकन करण्यासाठी 45 ते 50 किलो प्रति हेक्टर बियाणे लागते. • पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रति 10 किलो बियाणासाठी थायरम 37.5% + 37.5% कार्बोक्सिन, 30 ग्रॅम बियाणास चोळावे. त्यानंतर प्रती 10 किलो बियाणासाठी थायमिथोक्जाम 30 एफ.एस. 60 मिली आणि शेवटी 250 ग्रॅम रायझोबियम व 250 ग्रॅम पीएसबी बियाणास चोळावे. यामुळे मातीतून आणि बियाणाद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते आणि पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार थांबतो. तसेच खोडमाशी व रसशोषक किडींपासून संरक्षण होते. शिवाय पिकास नत्र आणि स्फुरदची उपब्धता होते. भुईमुग - खरीप हंगामामध्ये भुईमूग पेरणी वाफसा आल्यानंतर करावी. खरीप हंगामध्ये भुईमुग पेरणीसाठी एस.बी. 11, जे. एल. 24 (फुले प्रगती) टी.ए.जि.- 24, जे.एल.-501 फूले उन्नती, फुले मोरणा, फुले वारणा या वाणांची निवड करावी. • आंतरपिके : खरीप भुईमुग पिकात सोयाबीन, सुर्यफुल, मुग, उडीद तूर हि आंतरपिके 6:2 या प्रमाणात घेतल्यास अधिक आर्थिक फायदा होतो. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी भुईमुग + सोयाबीन (4:1) आणि कडेने एरंडीची लागवड (दोन ओळी) करावी. • बीजप्रक्रिया: बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर 25 ग्रॅम रायझोदिम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक चोळून बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे. राजमा - खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी मुठा, वरूण व फुले राजमा या वाणांची उपलब्धता करून घ्यावी. • बियाण्यांचे प्रमाण : 110 ते 120 किलो प्रति हेक्टर मूग - खरीप हंगामामध्ये मुग पेरणीसाठी वैभव पी.के.व्ही., ए.के.एम-4, बी.एम. 2003-2, बी.एम. 2002-1, उत्कर्ष, फुले चेतक, फुले सुवर्ण (पीएम-702-1) या वाणांची उपलब्धता करून घ्यावी. ऊस - 15 जुलै नंतर आडसाली उस लागवड करण्यासाठी आवश्यक पूर्वमशागत रानबांधणी आखणी पूर्ण करून घ्यावी. हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर करावा. ऊस पिकामध्ये तण नियंत्रण करावे. डाळिंब - पिवळे / निळे रंगाचे चिकट सापळे एकरी 24 या प्रमाणात बागेत नागमोडी पद्धतीने लावावेत, चिकट सापळे झाडाच्या उंचीच्या वरी भागापासून 15 से.मी. खाली लावावेत / लटकवावेत. जनावरे - गायी, म्हशी नुकत्याच प्रसव झाल्या असल्यास नवजात वासरांची विशेष दक्षता घ्यावी. नवजात वासरांना कोरड्या जागेवर उबदार वातावरणात ठेवावे. वासरांना त्याच्या वजनाच्या १० टक्के इतका चीक दिवसातून ३ ते ४ वेळा विभागून तीन दिवस द्यावा. त्यामुळे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढेल. संपूर्ण पावसाळ्यात स्तनदाहाचे प्रमाण वाढते. त्यासाठी दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर जीवाणुनाशक द्रावणाची कासेवर फवारणी करावी किंवा सडे द्रावणात बुडवावीत. (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा एएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या