मित्रालाच संपवण्याचा रचला कट
आसिफ मुरसल, सांगली सांगली, 6 मार्च : किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनी आपल्या मित्राचे अपहरण करून त्याचा खून करत मृतदेह जाळून टाकला. ही धक्कादायक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावची या ठिकाणी घडली आहे. ओंकार रकटे, असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वाचा - 17 व्या मजल्याहून उडी मारण्याचं करत होता नाटक, इतक्यात हात सुटला अन्.., VIDEO सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावची येथील ओंकार रकटे (वय वर्ष 23) या तरुणाचा अपहरण करून खून करत त्याचा मृतदेह जाळून हाडे नदीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ओंकार याच्या मित्रांनीच हा खून केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशा तिघा मित्रांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे याच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाली होती. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात निर्माण झाला होता. यातून सम्मेदने आपल्या मित्रांसमवेत ओंकार रकटे याचे अपहरण केलं होतं. त्यानंतर ओंकार याला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला.
खुनाच्या घटनेनंतर ओंकार याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकण्यात आला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची राख आणि हाडे पोत्यात भरून कृष्णा नदीमध्ये टाकून देण्यात आली होती, अशी कबुली तिघा संशयित मित्रांनी दिली आहे. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणांनी मित्राचाच खून केल्याने वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे.