स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 24 फेब्रुवारी: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याचा परिसर बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळा जातो. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा, कमी पर्जन्यमान यामुळे इथे सहसा कोणतेही पीक येत नाही. पाण्यासाठी काही दिवसांपूर्वी इथल्या नागरिकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. यामुळे राज्यभर जत तालुक्याची चर्चा झाली. मात्र, येथील एका शेतकऱ्याने नेहमी काश्मीरच्या खोऱ्यात येणारी सफरचंदाची शेती केली आहे. काकासाहेब सावंत प्रयोगशील शेतकरी जत तालुक्याच्या अंतराळ या गावातील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड करण्याचे विचार सुरू होते. मात्र, सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान लागते, असे ते ऐकून होते. जतसारख्या दुष्काळी भागात त्रिकाळ कडक उन्हाचा आगडोंब असल्याने त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणाऱ्या काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. धाडसाने सफरचंदाची लागवड करायचीच असा त्यांनी निर्णय घेतला. सफरचंदाची अधिक सखोल माहिती मिळविण्यासाठी गुगलवरूनही बरीच माहिती घेऊन अभ्यास केला.
हिमाचल प्रदेशातून आणली रोपे सुरुवातीला त्यांनी हिमाचल प्रदेशातून ‘हरमन 99’ या वाणाची 150 रोपे आणून त्याची एक एकरात लागवड केली. कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच मरून गेली. पण, योग्य ती काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली. मूळातच या भागात पाणी कमी असल्याने ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी या रोपांना पाणी आणि काही आवश्यक खतांचे डोस दिले. तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला. एका झाडाला 30-40 सफरचंद सध्या लागवड केलेल्या दुसऱ्याच वर्षी या बागेतील एका- एका झाडाला साधारणत: 30 ते ४० सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100, 150 ते 200 ग्रॅम इतके आहे. सध्या सफरचंदाचा प्रचलित बाजारभाव सरासरी 200 रुपयांच्या घरात आहे. त्या हिशेबाने एकेका झाडापासून त्यांना 600 ते 1600 रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. तर संपूर्ण बागेतील 125 झाडांचा विचार करता यंदा त्यांना 75 हजार ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. गायीच्या शेणापासून बनवली चक्क कोल्हापुरी चप्पल! पाहा Photos जत आणि हिमाचलमधील सफरचंद सारखीच सावंत यांच्या बागेतील सफरचंदामध्ये आणि हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा एकसारखाच आहे. सावंत यांच्या या अभिनव प्रयोगामुळे जम्मू-काश्मिरप्रमाणेच आता सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग डौलाने डोलू लागली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. दुष्काळी खानापुरात स्ट्रॉबेरीची शेती, पाहा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, Photos इतर शेतकऱ्यांना प्रेरणा यापूर्वी दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सफरचंदाचे झाड कसे असते हे देखील माहीत नव्हते. परंतु सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सफरचंदाची बाग आज बहरली आहे, ही बाग बघायला दूरवरून लोक येऊ लागले आहेत. कृषि विभागाचे अधिकारीही या बागेला भेट देऊन या सफरचंद लागवडीची माहिती घेऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सावंत यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागातील अन्य काही शेतकऱ्यांनीही सफरचंदाची लागवड करायची सुरुवात केली आहे.