सांगली, 5 जुलै: वटवृक्षाला भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे वटपौर्णिमा आणि इतर वेळी वटवृक्षाची पूजा केली जाते. सांगलीतील बिसूर येथे पाच पिढ्यांचा साक्षीदार असलेले वडाचे झाड उन्मळून पडलं. या 150 वर्षे जुन्या झाडाला नवसंजीवनी देण्याचं काम शेतकरी विश्वास पाटील यांनी केलं आहे. आता या झाडाला नव्यानं पालवी फुटत असून झाड पुन्हा उभा राहत आहे. पाच पिढ्यांचा साक्षीदार कोसळला बिसूर येथील विश्वास पाटील यांच्या शेतात गेल्या 5 पिढ्यापासून हे वडाचे झाड आहे. गेली दीडशे वर्ष हे झाड तेथे आहे. पण गेल्या महिन्यात जे प्रचंड वादळ आले त्या वादळात या जुन्या झाडाचा टिकाव लागला नाही आणि ते मुळापासून उन्मळून पडले. ते उन्मळून पडलेले झाड पाहून विश्वास पाटील आणि त्यांचे कुटुंबीय अगदी हेलावून गेले होते. कारण त्यांच्या गेल्या पाच पिढ्यांची नाळ या झाडाशी जोडली गेली होती. शेवटी या सर्व परिवाराने हे झाड पुन्हा उभे करायचा निर्णय घेतला आणि खरोखरच हे झाड पुन्हा नव्याने उभे केले.
वटवृक्षाला संजीवनी या झाडाच्या पूर्वेकडील भागात जास्त फांद्या होत्या. त्यामुळे हे झाड त्या बाजूला जास्त झुकले होते. इतकेच नाही तर ते अगदी त्या बाजूने जमिनीला टेकले होते. म्हणून त्या बाजूच्या झाडाच्या फांद्या विश्वास पाटील यांनी करवतीच्या साहाय्याने कापून टाकल्या. झाड आधार देऊन उभे केले. वर आलेल्या मुळ्यांवर माती टाकली. त्या मुळांवर कीड पडू नये म्हणून विविध कीटकनाशके फवारली. तसेच मुळांमध्ये पुन्हा नव्याने ताकद यावी यासाठी खते, संजीवके याची मात्रा दिली. यामुळे झाडाला नवसंजीवनी मिळाली आहे. कोल्हापूरकरानं 15 फूट झाडच आणलं उचलून, ‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट वटवृक्षाला फुटली पालवी विश्वास पाटील आणि कुटुंबीयांनी केलेल्या प्रयत्नांना फळ येऊन हे उन्मळून पडलेले झाड आता जगले आहे. कोवळ्या पानांनी अगदी बहरून आले आहे. आपल्या पाच पिढ्यांचा साक्षीदार असणारा हा वटवृक्ष वाचला तो संपला नाही याबद्दल विश्वास पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.