सांगली, 12 जुलै: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सांगलीतील बामणोलीची कन्या प्रियांका शिवाजी कारंडे हिनं यश संपादन केलंय. प्रियांका ही सायकलपटू असून खाकी वर्दी मिळवायचं तिचं स्वप्न पूर्ण झालंय. विशेष म्हणजे पोलीस भरती परीक्षेत यशानं हुलकावणी दिल्यानंतर प्रियांका जिद्दीनं पोलीस उपनिरीक्षक झाली. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य घरातील मुलगी सांगली जिल्ह्यातील बामणोली या गावातील प्रियांका ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिची लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याची महत्वकांक्षा होती. तिचे वडील माजी सौनिक आहेत तर आई गृहणी आहे. आई, वडिलांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. आता तिने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपले स्वप्न साकार केले. मुलीने आधिकारी व्हावे हे स्वप्न साकार झाल्याचा अभिमान वाटतो, असे वडील शिवाजी कारंडे सांगतात.
पोलीस भरतीत यशाची हुलकावणी बामणोली या छोट्याशा खेडेगावातून महिला पोलीस उपनिरीक्षक होऊन प्रियांकाने मिरज तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू आहे. तिची खाकी वर्दी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी तिनं पोलीस भरती परीक्षेतही प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी हुलकावणी मिळाली. शेवटी अभ्यास करून अधिकारी होण्याचा निश्चय तिनं केला. अखेर प्रियांका पीएसआय झाली. निकाल लागल्यावर प्रियंकाची बामणोली गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कर्ज काढून घेतली सायकल घरची परिस्थिती बेताची होती. मात्र, सायकलिंगच्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी सायकल घेण्याची आयपत ही नव्हती. सायकल स्पर्धेला जायचे होतं तेव्हा कोणीही मदतीला धावलं नाही. आईचं मंगळसूत्र गहाणवट ठेऊन कर्ज काढण्याची वेळ आली. वडीलांनी कर्ज काढले व सायकल स्पर्धेसाठी दोन लाखाची सायकल घेतली, असं प्रियांकानं सांगितलं. PSI Success Story: बापाने आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात तोडला ऊस, पोरगं आता अंगात घालणार खाकी वर्दी! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी खूप प्रयत्न पूर्वक सायकल घेऊन आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धासाठी गेले. विशेष म्हणजे ती स्पर्धा जिंकली. सामाजिक कार्यकर्ते सतिश मालू यांनीही मोलाची साथ दिली. सायकल स्पर्धांमध्ये सहभागी होत असतानाच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला आणि अखेर यश मिळालं. चांगला अधिकारी होऊन समाजाची सेवा करायची आहे. सामाजिक बांधिलकी जपून शासकीय सेवा करणार अशी माहिती प्रियांका कांरडे यांनी दिली. तिने आपल्या यशाचे श्रेय वडील शिवाजी, आई वैशाली, भाऊ रणजित, बहिण दिपाली आणि नातेवाईक यांना दिले आहे.