राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा
आसिफ मुरसळ, प्रतिनिधी सांगली, 27 एप्रिल : जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. अमोल कोल्हे यांच्या या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर एकमताने चर्चा होईल. माझ्या सत्काराच्या कार्यक्रमात कौतुक करताना अमोल कोल्हे यांनी ते वक्तव्य केलं, असं जयंत पाटील म्हणाले. अजितदादा आणि माझ्या किंवा पक्षात कोणतीही स्पर्धा नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे मेजॉरिटी आहे. अजितदादा आणि आम्हाला माहिती आहे. पोस्टरबाजी आणि मागणी या कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचं ते मत आहे, इथपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.
अजित पवार विरोधी पक्षनेते पद व्यवस्थित सांभाळत आहेत. मला पक्षाची जबाबदारी दिली आहे, ती मी सांभाळतोय. पक्षाची ताकद वाढल्याशिवाय पक्ष मोठा झाल्याशिवाय पुढची स्वप्न कोणी बघू नयेत. आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळात 54-55 आमदार आहेत. आणि पुढच्या काळात आमचा पक्ष कसा वाढेल. हे बघण्यातच आमच्या सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ठाकरेंकडचे 13 आमदार, राष्ट्रवादीचे 20 आणि काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या या दाव्यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात. तसे एकनाथ शिंदे ही माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळेच उदय सामंत म्हणतात काही खोटे नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या या विधानवरही जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. आमच्या पक्षात शरद पवार साहेब जे ठरवतात तेच धोरण असतं. त्यामुळे पवार साहेबांना जे योग्य वाटतं ते पवार साहेबांच्या निर्णयाने होत असते. आमच्या पक्षात पवार साहेब सर्व स्तरावरचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे ते म्हणतील त्याप्रमाणे होईल, असं जयंत पाटील म्हणाले.