nana patole
मुंबई, 5 मार्च: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना काँग्रेसचा आक्षेप असणाऱ्या अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. विशेषतः विरोधकांना उत्तर देण्याच्या नादात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोघांनी काँग्रेसची कोंडी केली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर किमान समान कार्यक्रम हा आघाडीचा गाभा होता. त्यात हिंदुत्व, सावरकर अडचणीचे विषय येऊ नये असे संकेत होते. मुख्यमंत्री यांनी केलेल्या भाषणात सावरकरांना भारतरत्न द्या, बाबरी मशीद आम्ही पाडली, खरे हिंदुत्ववादी आम्हीच, औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करणार हे विषय ठासून मांडले. एवढेच नव्हे तर त्याच्यावर मुख्यमंत्री ठामपणे बोलले. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेसचा सुद्धा याला पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. पण आता कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच सावरकरांना भारतरत्न देण्यास कॉंग्रेसचा पाठिंबा नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, “ सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा ही शिवसेनेची भूमिका आहे. या भूमिकेबद्दल शिवसेनेशी आमचं एकमत नाहीये. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि शाहू महाराजांना (Shahu Maharaj) भारतरत्न मिळावा ही आमची भूमिका आहे. आणि भारतरत्न देण्याचा अधिकार हा फक्त केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारला तो अधिकार नाही!” हे वाचा - आर्थिक पाहणी अहवाल सादर, अजित पवारांनी मांडला ‘राज्याच्या तिजोरी’चा लेखाजोखा! काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? “स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या असे पत्र दोन वेळा दिले गेलं होतं. देवेंद्रजी आपण त्यावेळी मुख्यमंत्री होता. पहिलं पत्र २०/०८/२०१८ आणि दुसरं पत्र १७/०१/२०१९ या तारखेला पाठवलं होतं. कोण देतं हो भारतरत्न? आपली आमदारांची कमिटी आहे का? भारतरत्न देण्यासाठी आमदारांची कमिटी तयार करायची का? भारतरत्न देण्याचा अधिकार हा पंतप्रधान आणि केंद्रीय समितीला आहे. पण का नाही दिलं जात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न?” सावरकरांना भारतरत्न देत नाही आणि आम्हाला सांगता संभाजीनगर करा. आम्ही करु ना जरुर संभाजीनगर करु.” असं बुधवारी (3 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषणात म्हटलं होत. नाना पटोलेंच्या आता या नव्या मागणीनंतर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.