विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 2 मे: दिवसागणिक वाढणारे तापमान ही संपूर्ण जगभरासाठी चिंतेची बाब आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जागतिक स्तरावर त्यावर ठोस उपाययोजना, संशोधन विचार- मंथन सुरू आहे. त्यासाठी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (VNIT) वतीने सर्वसमावेशक ‘हिट ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच कृती आराखडा तयार होत असून तो देशभरातील सर्व शहरांना लागू पडणार आहे. उष्माघाताचा सामना करण्यासाठी सध्याच्या कृती आराखड्यात त्याचा समावेश केला जाणार आहे. देशातील सर्व शहरांसाठी एकच ‘हिट अॅक्शन प्लॅन’ विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अर्थात व्हीएनआयटी आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. राजश्री कोठारकर यांनी ‘ड्राफ्ट मॉडेल’ तयार केला आहे. तो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सुपूर्द केला जाणार आहे. सध्या प्रत्येक राज्याची स्वतंत्र उष्णता कृती योजना आहे. महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु ही उष्णता कृती योजना दीर्घकालीन नाही. सध्या ‘हिट ॲक्शन प्लॅन’ची मर्यादा विविध प्राथमिक स्वरूपात उष्णतेच्या तीव्रतेमुळे होणारे मृत्यू रोखणे हे आहे. मात्र यावर अधिक काम करून ‘हिट ॲक्शन प्लॅन’ देशातील इतर शहरांसाठी सारखाच असावा, यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागपूरच्या व्हीएनआयटी विभागातील आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. राजश्री कोठारकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
नागपुरातील तापमानाचा 10 वर्षांपासून अभ्यास ‘हिट ॲक्शन प्लॅन’ तयार करताना जगभरातील ‘हिट ॲक्शन प्लॅन’चा अभ्यास केला. तसेच देशातील दीर्घकालीन उष्मा कृती योजनेसाठी नागपुरातील तापमानाचा गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला जात आहे. शहरातील विविध भागातील तापमानाचा अभ्यास करण्यात आला. कोणत्या भागात जास्त आणि कमी तापमान आहे? या तापमानाचा लोकांवर काय परिणाम होतो? उंच इमारती आणि झाडे असलेल्या भागांतील रहिवाशांवर काय परिणाम होतो? याचा सखोल अभ्यास करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे. देशातील सर्वच शहरात एकच ॲक्शन प्लॅन वापरता येईल असा हा पहिलाच प्रयोग आहे, असे राजश्री कोठारकर यांनी सांगितले. सावधान! मे महिना उन्हाच्या झळा आणि वादळी पावसात जाणार PHOTOS लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनकडे सुपूर्द जागतिक स्तरावर ‘हिट अॅक्शन प्लॅन’बाबत आठ निकष दिले आहेत. त्यानुसार परिपूर्ण अभ्यास करून काही निष्कर्ष नमूद केले. ज्यामध्ये प्राथमिक, मध्यम आणि दिर्घकालीन उपाययोजनांचा समावेश केला आहे. शिवाय हा ॲक्शन प्लॅन काय आहे? त्याची अंमलबजावणी कशी करावी? या संदर्भात टेम्प्लेट देखील देण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात एक कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रारूप दाखविण्यात आले व अंमलबजावणीसाठी काय करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. ‘हिट अॅक्शन प्लॅन’ लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सुपूर्द केला जाईल, असेही कोठारकर यांनी सांगितले.