विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 9 जून: विदर्भातील उन्हाळा हा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत सहसा तीव्रच असतो. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्हातील तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या तीव्रतेने मनुष्याच्या जीवाची लाही-लाही होत असतानां या उन्हाचा फटका मुक्या जनावरांना देखील बसतो आहे. वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादन क्षमता कमी होत असून या दिवसात दूध पातळ येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच दुभत्या जनावरांच्या जीविताला धोकाही निर्माण होण्याची शक्यता असते. उत्तम आहार, गोठ्याचे नियोजन आणि काही बारीक सारीक मात्र महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता केल्यास धोका टाळता येतो. असे करावे गोठ्याचे व्यवस्थापन माणसांप्रमाणे जनावरांना देखील उष्णतेचा परिणाम सहन करावा लागतो. मात्र योग्य प्रकारे जनावरांचे नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास उष्णतेचा धोका कमी करून होणारे नुकसान टाळता येते. उन्हाच्या काळात जनावरांना मोकळ्या जागी चरायला सोडू नये. सकाळी 11 ते 5 या कालावधीमध्ये उन्ह जास्त असते. तेव्हा जनावरे गोठ्यातच ठेवावीत. गोठा हवेशीर असावा. गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून त्यातील हवा खेळती राहील. गोठा पत्र्याचा असेल तर त्यावर, कडबा, पालापाचोळा, गवत टाकून पत्रा गरम होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुपारी जनावरे दाट पाने असलेल्या आंबा, चिंच, कडुलिंब, अशा झाडाखाली बांधावीत, असे आवाहन महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे.
पिण्याच्या पाण्याची काळजी उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराला सतत घाम येतो. या दिवसांत श्वसन वेग वाढल्यामुळे शरीरातील पाणी बऱ्याचदा बाहेर येतं. त्यामुळे पाण्याचां जास्त पुरवठा सतत करणं गरजेचं आहे. एरवी जनावरे आपल्या वजनाच्या 10% पाणी पितात तिथे या दिवसांत 15% पर्यंत पाणी पित असतात. त्यामुळे स्वच्छ, थंड आणि दिवसातून 4-5 वेळा पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि शरीर निर्जल न राहता शरीराचे तापमान स्थिर राहील असे मत डॉ. अनिल भिकाने बोलतांना व्यक्त केले. 100 पेक्षा जास्त श्वानंसह एकाच घरात राहते 22 वर्षांची तरूणी, कसा करते सांभाळ? पाहा Video आहार व्यवस्थापन महत्त्वाचे उन्हाळ्यात जनावरांच्या आहारात कमालीचा बदल जाणवत असतो. या दिवसात जनावरे वाळलेला चारा खाणे पसंत करत नाहीत. त्यामुळे शक्य असल्यास ओला चारा देण्यास प्राधान्य द्यावे. दिवसा हिरवा आणि रात्री वाळला चारा देणे उत्तम राहील. या दिवसात शरीरातून घाम व इतर माध्यमातून क्षार बाहेर पडत असतात. त्यामुळे आहारात मिठाचा समावेश करावा. त्याच प्रमाणे दररोज खनिज मिश्र देण्याची गरज या दिवसात असते. पाण्यातून जीवनसत्व टॉनिक जनावरांना दिल्यास त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आधुनिक गोठा असल्यास स्प्रींकलर अथवा फॉगर्सच्या माध्यमातून दिवसातून 2-3 वेळा गोठा थंड होईल असे करावे. किंवा कुलर, पंखा इत्यादी उपकरण शक्य असल्यास वापर करावा, असे डॉ. भिकाने यांनी सांगितले.