नागपूर, 3 जुलै: संपूर्ण जगात आज भारत देशाची अर्थव्यवस्था मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आज भारत देश हा शेती व शेतीपूरक उत्पादनात सर्वात मोठा उत्पादक होऊ पाहतो आहे. जगभरातील मत्स्योत्पादनात भारत पहिल्या तिघांमध्ये गणला जात असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. त्यामुळे मत्स्य विज्ञान क्षेत्रात करियर च्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आपणही करियरचा एक उत्तम पर्याय म्हणून या क्षेत्राकडे पाहत असाल तर नागपुरातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात प्रवेश घेऊ शकता. याबाबत मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता सुधीर कविटकर यांनी माहिती दिली आहे. मत्स्य विज्ञान क्षेत्रातील संधी भारतात जागतिक दर्जाची लक्षनिय गुंतवणूक, बंदरे, रसद, आणि पुरवठा साखळीच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. भारत सरकारची सक्रिय धोरणे गुंतवणूकदारांना अनुकूल प्रोत्साहन आणि उच्च कुशल मनुष्यबळ इत्यादीमुळे मत्स्य व्यवसायासारख्या व्यवसायाला खूप मोठी चालना मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रात खऱ्या अर्थाने निल क्रांती घडत आहे. मत्स्य व्यवसाय हा देशातील कोट्यावधी जनतेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगाराचे महत्त्वाचे साधन बनले आहे.
पदवीधारकांना नोकरीच्या संधी मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाकरिता तसेच मत्स्य उत्पादन वाढविण्याकरता मत्स्य विज्ञान शाखेतील कुशल मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी पुढील काळात पदवीधारकांची फार मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे मत्स्त्य विज्ञानाचे शिक्षण घेतलेल्यांना रोजगारांच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या मत्स्य विज्ञान पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर आणि रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. कुठं घ्याल प्रवेश? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत आज घडीला महाराष्ट्रात दोन महाविद्यालय कार्यरत आहेत. त्यातील एक नागपूरला तर दुसरे उदगीर येथे आहे. मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे एकूण 32 जागा असून महाराष्ट्रतील विद्यार्थ्यांसाठी 28 तर आयसीएआर नवी दिल्ली यांच्यामार्फत 7 जागा भरल्या जातात. तसेच मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर येथे देखील 32 जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी तर आयसीएआर नवी दिल्ली यांच्यामार्फत भरल्या जाणाऱ्यां 6 विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. AIIMS Recruitment: 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी AIIMS मध्ये बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर ही घ्या डायरेक्ट लिंक काय आहे पात्रता? या महाविद्यालयात मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता ही विद्यार्थ्याने बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. यासह फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयांसह अराखीव वर्गासाठी 50 टक्के गुण व राखीव वर्गासाठी 40 टक्के गुणांचा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तसेच विद्यार्थ्याने राज्य शासन मुंबईतर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचसीइटी ही सामान्य प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. गुणवत्ता यादीतील सुधारित गुणांच्या आधारावर उमेदवाराला मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता येईल. काय आहे अभ्यासक्रम? मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम हा चार वर्षाचा अभ्यासक्रम असून यामध्ये आठ सेमिस्टर समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अभ्यासक्रमातील विषय माशांचे वर्गीकरण, मत्स्य जीवनशास्त्र, मत्स्य संसाधन व्यवस्थापन, जलीय पर्यावरण, मत्स्यसंवर्धन पद्धती आणि तंत्रज्ञान, मत्स्य अभियांत्रिकी, मत्स्य प्रक्रिया विपणन आणि अर्थशास्त्र इत्यादी विषय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सहा-सत्रांमध्ये शिकवले जातात. तर पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये मत्स्य प्रक्षेत्र किंवा मत्स्य प्रक्रिया उद्योगांमध्ये इन प्लांट ट्रेनिंगचे आयोजन केले जाते. आठव्या सत्रामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंगचे आयोजन केले जाते. ‘या’ शाळेत आहेत 70 वर्षांचे विद्यार्थी, नुकतेच काही जण झाले दहावी पास! कुठे कराल अर्ज? या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज आणि माहितीसाठी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.mafsuac.in हे उपलब्ध असून त्यावर दिलेल्या सूचनांचे पालन करीत अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका मध्ये दिलेली संपूर्ण माहिती वाचावी. त्यानुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि परिपूर्ण माहिती अर्जामध्ये सादर करावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै 2023 असून विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छणाऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे. भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी आपली जागा सुनिश्चित करावी, असे आवाहन मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता सुधीर कविटकर यांनी केले आहे.