बस अपघातातून वाचलेले प्रवासी
बुलढाणा 01 जुलै : बुलढाण्यात शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. यात समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्समधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बीई 1819 ही नागपूरवरुन पुण्याला जात होती. या अपघातातून बचावलेल्यांनी अपघातावेळी नेमकं काय घडलं, ते सांगितलं आहे. नागपूरहून या बसमध्ये बसलेल्या आणि अपघातातून बचावलेल्या दोन तरुणांनी सांगितलं, की बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने पेट घेतला . हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 5 ते 6 प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण अपघातातून ते बचावले. मात्र इतर 25 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. Buldhana Bus Accident : अपघातात 25 जणांचा मृत्यू; 6 तास उलटूनही मृतदेहांची ओळख पटेना; पोलिसांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय झालं? 30 जून रोजी बस नागपूरवरुन सायंकाळी 5 वाजता पुण्याला जाण्यासाठी निघाली होती.1 जुलैच्या रात्री 1 वाजून 22 मिनिटांनी विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. आता अशी माहिती समोर येत आहे, की हा अपघात झाला तेव्हा बसचा वेग सामान्य होता. प्राथमिक तपासात दोन गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली अशी की स्पीड ब्रेकरमुळे बसचं संतुलन बिघडलं आणि बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. टँकरने पेट घेतला आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. दुसरं असंही सांगितलं जात आहे, की पुढचा टायर फुटून बसचा तोल बिघडल्याने बस पलटी होऊन आग लागली. उलटल्यानंतर बस त्या बाजूला पडली, जिथे प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी गेट होतं. त्यामुळे प्रवाशांना गेट उघडता न आल्याने प्रवासी आतमध्येच जळाले. बाकी 8 जण ड्रायव्हरच्या गेटमधून बाहेर आले आहेत. अपघात झाला तेव्हा सर्वजण झोपेत होते, त्यामुळे उठून स्वतःला वाचवण्याच्या आधीच ते सगळे जिवंत जळाले.