JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय', शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली

'पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय', शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली

‘तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे’

जाहिरात

'तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 ऑक्टोबर : ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. ‘ पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणीच पाणी साचले होते. पुण्यात पाणी साचल्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला होता. आता शिवसेनेनंही दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. (पुणे मनपा हद्दीत 23 गावं समाविष्ट करण्यावरुन नवा ट्विस्ट; माजी आमदार शिवतारेंच्या यू टर्नमुळे राष्ट्रवादीचा संताप) पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवड्यातील धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढीत आहेत. पुणे महापालिकेत सत्ता राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले. मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते सोमवारच्या पावसाने दाखविले, असा सणसणीत टोला शिवसेनेनं भाजपला लगावला. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये. हे ‘स्मार्ट सिटी’ पुण्यात घडले. पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय, असा प्रश्न आज जगाला पडला आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला टोला लगावला. (पुणे तुंबले, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली, मोहोळ यांचे अजितदादांनाच 7 सवाल) ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’ असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले. पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले, परंतु भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला. शहराचे मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा केवळ दिखावू, शोभेची कामे करण्यातच रस दाखविला गेला. जलव्यवस्थापन, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, रस्ते अशा मूलभूत कामांचे नियोजन करण्याऐवजी सुशोभिकरणाचा डोलारा करण्यातच महापालिकेचे कारभारी मश्गूल राहिले. कचरा व्यवस्थापनावर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही राष्ट्रीय स्वच्छ शहर स्पर्धेत पुण्याचे मानांकन घसरते तेव्हाच विकासाच्या गप्पा आणि थापा लक्षात येतात. शहराची वाट्टेल तशी बेभरवशी वाढ आणि नियोजनाचे मार्ग तुंबल्यामुळे शहराची बकालतेकडे वाटचाल होत आहे’ अशी टीकाही सेनेनं केली. (  मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO ) ‘केवळ पावसावर ठपका ठेवून भागणार नाही, तर नियोजन काय केले ते पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या ‘महाशक्ती’ला सांगावे लागेल. पुण्यासारख्या शहरात विकास नियमावलीतील 270 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झालेलेच नाहीत. शहरातील दोनशे बावन्न नाले-ओढय़ांपैकी केवळ 60 नाले-ओढे प्रवाही आहेत. अनेक नाले अतिक्रमणाने बुजले आहेत. आता तर मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने निळ्या पुररेषेच्या आत भिंत घालून जमीन तयार करण्याचा घाट घातला जातोय. अर्धवट असलेल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचे धाडस पुण्यातील भाजपच्या कारभाऱ्यांनी केले. निवडणुकांची चाहूल असताना संपूर्ण पुणे भाजपच्या होर्डिंग्जने नटले होते. पुणे बदलतंय अशी शेखी हे फलक मिरवीत होते. सोमवारच्या पावसात हे सगळेच फलक, त्यावरील आश्वासने, स्वप्ने वाहून गेली. पुण्याचा विकास या पावसात फक्त भिजला नाही तर वाहून गेला’ अशी टीकाही सेनेनं केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या