महाराष्ट्राला पावसाचा मोठा फटका
मुंबई, 22 जुलै : राज्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, कोकण आणि विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू आहे. या पवासाचा मोठा फटका हा शेतीसह नदी काठच्या गावांना बसला आहे. काही ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे, तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे राज्याच्या कोणत्या भागात किती नुकसान झालं? याचा हा आढावा. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. संग्रामपूर आणि जळगाव तालुक्यातील लेंडी नदीला महापूर आल्यानं पुराचे पाणी गावात शिरलं आहे. जळगाव जामोद तालुक्यातील काथरगाव आणि दुर्गादैत्य गावाला पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावात अनेक लोक अडकून पडले आहेत. अमरावती गेल्या तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पाऊस सुरू असल्यानं प्रमुख प्रकल्पांमधून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हातुर्णा गावाला पाण्याने विळखा घातला आहे. घरात पाणी शिरल्यानं सर्व संसारोपयीगी साहित्य पाण्यानं भीजलं आहे. या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने यवतमाळ शहराला झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नदी नाल्याला पूर आल्यानं पाणी गावात शिरलं आहे. यवतमाळ शहराला लागून असलेल्या वाघाडी गावात पहाटेच्या सुमारास पाणी शिरलं. येथील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे.
Weather Update : आज या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, घराबाहेर पडण्याआधी बघा तुमच्या भागातील स्थितीसिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आंबोली घाटात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तब्बल 15 तास एकेरी वाहतूक सुरू होती. 15 तासांनंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे. अति पावसामुळे वाहतूक ठप्प झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.